अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेवेन्स्की यांचे अफेयर हे सत्तेच्या दुरुपयोगातून झाले नव्हते असे म्हणत अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी बिल क्लिंटन यांचा बचाव केला आहे. मोनिका प्रकरणात राजीनामा न देण्याचा बिल यांचा निर्णय योग्य होता असेही त्यांनी म्हटले आहे. सीबीएस न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना मोनिकासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले आहे.

मोनिका लेवेन्स्की प्रकरण प्रकाशात आले तेव्हाच बिल क्लिंटन यांनी राजीनामा द्यायला हवा होता, असे मत न्यूयॉर्कचे डेमोक्रेटिक सिनेटर क्रिस्टन गिलीब्रांड यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. याबाबतच हिलरी क्लिंटन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी बिल क्लिंटन यांची बाजू घेत मोनिका प्रकरणी बिल क्लिंटन यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय योग्य होता असे म्हणत त्यांची पाठराखण केली आहे.