‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनीदेखील केंद्र सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे. नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत त्यांनी देशातल्या शहरी भागांत आरोग्य सुविधा उभारण्यासाठी केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
गेट्स यांनी स्थापन केलेल्या ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ने जानेवारीमध्ये नागरी विकास विभागाशी सहकार्य करार केला होता. त्याच्याच पूर्ततेसाठी भारतभेटीवर आलेल्या गेट्स यांनी भारतीयांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेता येतील, यावर नायडू यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. नायडू यांनी त्यांना भारतात सुरू असलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमांची सुरुवात संथ गतीने झाली असली, तरी आता या मोहिमांबाबत शहरी भागातील नागरिकांबद्दल उत्साह आहे, असे त्यांनी गेट्स यांना सांगितले. त्या वेळी गेट्स यांनी भारतीयांचे आरोग्य सुधारण्यासाठी मलनिस्सारण व्यवस्थापनाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. आफ्रिकेत उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचेही त्यांनी उदाहरण दिले. वेगवेगळ्या कारणांमुळे ही स्वच्छतागृहे वापराअभावी पडून आहेत. स्वच्छतागृह बांधणीच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाल्यास त्यांचा वापर वाढू शकेल, असे मत गेट्स यांनी व्यक्त केले. तसेच, भारतातील आरोग्यविषयक क्षेत्रांत सुरू असलेले त्यांच्या संस्थेच्या कार्याचा विस्तार करण्याचीही त्यांनी घोषणा केली.
एकीकडे केंद्र सरकार स्वच्छतागृहांच्या उभारणीवर भर देत असताना घनकचरा व्यवस्थापनासाठीही सरकारने पावले उचलल्याचे नायडू यांनी सांगितले. त्याकरिता कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकांना प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती त्यांनी गेट्स यांना दिली.