बांगलादेशमधील बिमान बांगलादेश या एअरलाइन्सने आपल्या ताफ्याचा आणि प्रणालीचा विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून भारतातील विविध शहरांमध्ये सेवेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. येत्या काही महिन्यांतच कोलकात्याला जाणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोलकात्याहून आठवडय़ातून पाच उड्डाणांऐवजी दररोज दोन विमाने सोडण्याची योजना बिमानने आखली आहे. भारत आणि बांगलादेश यादरम्यान व्यवसायानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना आपले काम आटोपून सायंकाळी पुन्हा घरी परतणे शक्य व्हावे यासाठी ही योजना आखण्यात येणार आहे, असे एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक जॉन स्टील यांनी सांगितले.
ढाक्याहून सध्या कोलकाता आणि दिल्ली येथेच बिमान बांगलादेशची सेवा उपलब्ध आहे. दिल्लीला जाणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ करून येत्या दीड वर्षांत चेन्नई, बंगळुरू आणि मुंबईतही ही सेवा सुरू करण्याची योजना आहे. गुवाहाटी आणि भुवनेश्वर येथेही सेवा सुरू करण्याचा विचार आहे, असे सांगण्यात आले.