सीबीएसईच्या बारावीच्या जीवशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना एक अवघड प्रश्न विचारला आहे आणि आता या प्रश्नाचे उत्तर नेमके तपासायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. अंत्यसंस्काराबद्दल विचारण्यात आलेल्या या प्रश्नांबद्दल आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना लोकांकडून प्रश्न विचारले जात आहेत.
सीबीएसईच्या बारावीच्या जीवशास्त्राच्या ड गटात वायू प्रदूषणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी मृतदेहाला जाळावे की पुरावे? आणि का?’ असे प्रश्न सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले होते. या प्रश्नावरुन विद्यार्थ्यांच्या मनात मोठा गोंधळ निर्माण झाला. ‘असा प्रश्न जीवशास्त्राशी निगडित कसा काय असू शकतो? मृतदेहांना जाळण्यापेक्षा ते पुरण्यात यावेत, असा प्रचार सीबीएसईला करायचा आहे का? ज्यांच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा पटकन परिणाम होतो, अशा वयाच्या मुलांना सीबीएसईने या प्रश्नावर स्पष्टीकरण देण्यासदेखील सांगितले,’ असे आलोक भट्ट यांनी म्हटले आहे. या आशयाचे ट्विट करुन भट्ट यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासाठी केले आहे.
Dear @PrakashJavdekar here is the Qn from today's Biology Qn paper for Class 12th @HRDMinistry pic.twitter.com/DGGfBSCVlL
— Alok Bhatt (@alok_bhatt) April 5, 2017
सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर नेमके कसे तपासायचे, याबद्दल शिक्षक संभ्रमात आहेत. मात्र प्रदूषण हा जीवशास्त्राशी संबंधित मुद्दा आहे आणि सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून विचारले जात असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेत १० ते १२ गुणांसाठी प्रश्नाचे उत्तर लिहून त्याबद्दल विश्लेषण करावे लागते.
‘प्रश्नपत्रिकेत एखादा अवघड प्रश्न १० ते १२ गुणांसाठी विचारला जातो. विद्यार्थ्यांना संपूर्ण स्पष्टीकरणासह या प्रश्नाचे उत्तर लिहायचे असते,’ असे एव्हरग्रीन वरिष्ठ माध्यमिक शाळेच्या जीवशास्त्राच्या शिक्षिका श्रृती गुप्ता यांनी सांगितले. याच शाळेचा विद्यार्थी असलेल्या अभिषेक यादवने प्रश्नपत्रिका अतिशय अवघड असल्याचे सांगितले. ‘प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला प्रश्न संकल्पनेवर आधारित होता. तो प्रश्न विद्यार्थ्यांच्या अॅप्लिकेशन स्किल्सवर आधारित होता,’ असे यादव यांनी म्हटले आहे. इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनीदेखील जीवशास्त्राचा पेपर कठीण गेल्याचे सांगितले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 5:50 pm