दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास  चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘युगपुरुष अटल’ असं या चरित्रपटाचं नाव असून या वर्षाअखेरीस तो प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी अटलजींच्या वाढदिवशीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र आपला चरित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अटल बिहारी वाजपेयींची प्राणज्योत मालवली.

मयांक पी श्रीवास्तव या चरित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून ‘स्पेक्ट्रम मूव्हीज’चे रणजित शर्मा त्याची निर्मिती करत आहेत. अटलजींच्या बालपणापासून ते राजकारणातील चढउचार अशा सर्व गोष्टी या चित्रपटातून उलगडणार आहेत. या चित्रपटाचं बजेट तब्बल ५० कोटी रुपयांचं असल्याची माहिती आहे. ‘मी अटलजींसोबत काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्याचं माझं स्वप्न होतं. ते आता सत्यात उतरताना दिसत आहे’, असं निर्माता रणजित शर्मा म्हणाले होते. अटलजींसोबतच पंडीत जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी यांच्याही व्यक्तिरेखा चित्रपटात असतील.

या चित्रपटाला बप्पी लहरी संगीत देणार असून गाण्यांमध्ये अटलजींनी लिहिलेल्या कवितांचा समावेश असेल. यामध्ये वाजपेयींची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट वाजपेयींच्या ९४व्या वाढदिवशी म्हणजेच २५ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता.