लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी जयपूर येथे केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांनी म्हटले की, शत्रूपक्षालाही तितक्याच वेदना जाणवल्या पाहिजेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय जवानाचा शिरच्छेद केला जाणे आणि जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने जुलै २०१६ मध्ये ठार मारलेला हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हान वाणी याच्या नावाने पोस्टाचे तिकिट जारी करणे या कृत्यांवर जनरल रावत प्रतिक्रिया देत होते. पाकिस्तानच्या कारवायांबाबत भारत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. दहशतवादाचा प्रसार आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाहीत. त्यामुळे चर्चा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच आहे. पाकिस्तानने दहशतवादावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे, असे रावत म्हणाले.

पाकिस्तानी सैन्य आणि तेथे आसरा घेऊन कारवाया करणारे दहशतवादी भारतीय जवानांशी अत्यंत अमानुषपणे वागत आहेत. पाकिस्तानच्या या रानटीपणाचा बदला घेतलाच पाहिजे. शत्रूलाही तितक्याच वेदना जाणवल्या पाहिजेत. आजवर भारताने पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. पाकिस्तानलाही सैनिक गमावावे लागले आहेत. मात्र भारताने कधीही माणुसकीची मर्यादा ओलांडलेली नाही. शत्रूसैनिकांच्या मृतदेहांची कधीही विटंबना केलेली नाही. पाकिस्तानच्या कारवायांना कठोर उत्तर देताना आपणही त्यांच्यासारखा रानटीपणा करण्याची गरज नाही. पण  पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, असे रावत म्हणाले.

भारताकडून ‘उद्धटपणा’

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमध्ये होऊ घातलेली बैठक रद्द करण्याचा भारताचा निर्णय ‘उद्धटपणाचा’ असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी व्यक्त केली. भारताच्या या ‘नकारात्मक’ प्रतिसादामुळे आपली निराशा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे, तसेच पाकिस्तानने काश्मिरी दहशतवादी बुऱ्हान वानी याचे उदात्तीकरण करणारी टपाल तिकिटे काढल्यामुळे भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या निमित्ताने सुषमा स्वराज व शाह मेहमूद कुरेशी यांची न्यूयॉर्कमधील प्रस्तावित बैठक रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. शांतता संवाद पुन्हा सुरू होण्याबाबत मी केलेल्या आवाहनाला भारताने दिलेल्या उद्धट आणि नकारात्मक प्रतिसादामुळे माझी निराशा झाली आहे, असे इम्रान खान यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bipin rawat on pakistan
First published on: 23-09-2018 at 00:59 IST