बिरभूम जिल्ह्य़ात खाप पंचायतीच्या आदेशावरून एका २० वर्षीय आदिवासी युवतीवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने अवघा देश हादरला असला तरी अशा प्रकारची सामूहिक बलात्काराची कोणतीही घटना घडलीच नसल्याचा दावा येथील आदिवासी नेत्यांनी केला आहे.
गावच्या प्रमुखाला गोवण्यासाठी सदर २० वर्षीय आदिवासी युवती धादांत खोटे आरोप करीत असून संथल समाजाच्या पारंपरिक न्यायप्रक्रियेला मीडिया बदनाम करीत आहे, असेही बिरभूम येथील आदिवासी नेत्यांनी म्हटले आहे.
संथल समाजाची अंतर्गत न्याय प्रक्रिया (सालिशी सभा) असून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न मीडियाकडून होत असल्याबद्दल या समाजातील विविध २० संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध जिल्ह्य़ांतील संथल समाजाच्या २० संघटनांचे कार्यकर्ते येथील मोहम्मद बाजार या आदिवासीबहुल ठिकाणी एकत्रित आले होते आणि त्यांनी मीडियाबद्दल नाराजी व्यक्त केली.
‘भारत जाकट माझी मारोआ’च्या बिरभूम जिल्ह्याच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला संथल नेते, विद्यार्थी नेते आणि ज्या लाभपूर गावांत बलात्काराची घटना घडली तेथील महिलांही उपस्थित होत्या. आमच्या समाजाच्या पारंपरिक न्यायप्रक्रियेच्या समर्थनार्थ जनमत तयार करण्यास आम्ही सुरुवात केली आहे, असे नेत्यांचे म्हणणे आहे.