हवाईदल प्रमुखांचे अधिकाऱ्यांना पत्र

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी हवाई दलातील सर्व अधिकाऱ्यांना वैयक्तिक पत्र पाठवले असून त्यात सध्या आहे त्या साधनसामग्रीनिशी, अल्पावधीची आगाऊ सूचना मिळालेली असताना त्वरित कारवायांसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशाच्या हवाईदल प्रमुखांनी अशा प्रकारचे पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फिल्ड मार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी १ मे १९५० रोजी आणि जनरल के. सुंदरजी यांनी १ फेब्रुवारी १९८६ रोजी अशा प्रकारे लष्करातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. धानोआ यांनी हवाईदल प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे ३० मार्च रोजी हे पत्र लिहिले आहे. ते पत्र हवाईदलातील सर्व म्हणजे सुमारे १२,००० अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

धानोआ यांनी या पत्रात हवाईदलाशी निगडित अनेक विषयांचा स्पष्टपणे परामर्श घेतला आहे. देशाला सध्या दहशतवाद व छुप्या युद्धाचा तसेच जम्मू-काश्मीरमधील अस्थैर्याचा धोका भेडसावत आहे. अशा वेळी आहे त्या साधनसामग्रीनिशी, अगदी कमी वेळाची सूचना मिळताच कारवाईला सज्जा राहा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. आहे त्या साधनसामग्रीनिशी असा उल्लेख करताना धानोआ यांचा रोख हवाईदलातील लढाऊ विमानांच्या घटत्या संख्येकडे आहे. हवाईदलासाठी मंजूर स्क्वॉड्रनची संख्या ४२ आहे. मात्र सध्या ती संख्या ३३ स्क्वॉड्रनपर्यंत खाली आली आहे. फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने तातडीने घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यांनी गरज पूर्णपणे भागणार नाही.

धानोआ यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित कारवाईसाठी कायम सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच आपल्या कामगिरीचा स्तर अत्युच्च राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या नव्या घडामोडी व शत्रूच्या तांत्रिक क्षमतांबाबत अद्ययावत माहिती राखली तरच युद्ध जिंकण्यासाठी नव्या कल्पना सुचू शकतात, असे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत व्यावसायिक क्षमतांमधील त्रुटींमुळे हवाईदलाची प्रतिमा खराब झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच महत्त्वाच्या पदांवरील नियुक्ती करताना मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप देण्याच्या व चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या घटना लक्षात आल्याचे सांगितले. यापुढे अशी वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही, असेही पत्रात बजावले आहे. महिलांवरील अत्याचारही चालणार नसल्याचे सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्या पत्नींनी एअर फोर्स वाइव्ज वेलफेअर असोसिएशन आणि लेडीज क्लबच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे ऐच्छिक आहे. एखाद्या हवाई तळाचे मूल्यमापन त्याआधारे होत नाही, तर संरक्षणासंबंधी कामगिरीवरून होते, असा इशाराही त्यांनी पत्रात दिला आहे.

या पत्रासंदर्भात हवाई दलाच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हे अंतर्गत पत्र आहे, असे म्हणून अधिक माहिती देण्यास नकार दिला.