नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कोलकात्यात आयोजित कार्यक्रमात सुप्त सत्ता संघर्ष बघायला मिळाला. जयंती कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. भडकलेल्या ममतांच्या टीकेला भाजपाच्या नेत्यानं प्रत्युत्तर दिलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानं तृणमूल काँग्रेस भाजपा यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला जात असल्याचं दिसत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंती कार्यक्रमात पुन्हा एकदा याची प्रचिती आली. कोलकत्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत बोलण्यास नकार दिला. यावरून भाजपाचे हरयाणातील आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ममतांवर टीकास्त्र डागलं आहे. विज यांनी ट्विट केलं असून, “ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं आहे. त्यामुळेच त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये भाषण थांबवलं,” असं विज यांनी म्हटलं आहे.

जयंती कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरून आता भाजपा-तृणमूलच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांनी कार्यक्रमात करण्यात आलेल्या घोषणाबाजीवर टीका केली आहे. “प्रभू रामाचं नाव गळ्यात गळे गालून घ्या, गळे दाबून नव्हे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या राजकीय व धार्मिक घोषणांचा मी निषेध करते,” असं जहां यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मंत्री मोहसिन रजा यांनी ममतांवर टीका केली आहे. “ममता बॅनर्जी यांना आता रामाचं नाव घेतल्यामुळे अपमानस्पद वाटू लागलं आहे. प्रभू राम आमच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम हे ऐकून ममतांना अपमानस्पद वाटत असेल, तर तेथील जनतेला किती अपमान वाटत असेल. बंगालमधील जनता याचं उत्तर ममतांना देईल,” असं रजा यांनी म्हटलं आहे.