दिल्लीत यशवंतराव जन्मशताब्दी साजरी
(सुरेंद्र कुलकर्णी)
दिल्लीच्या सार्वजनिक उत्सव समितीतर्फे, मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी महोत्सव आयोजिण्यात आला होता. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री व त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय गृह, वित्त संरक्षण, परराष्ट्र खाती यशस्वीपणे सांभाळणारे यशवंतराव यांनी देशाचे उपपंतप्रधानपदही भूषविले होते. महाराष्ट्र व देशाच्या विकासात असलेल्यांचे भरीव योगदान केले हे सर्वज्ञात आहे. एक यशस्वी राजकारणी असलेले यशवंतराव विविध ललित कलांचेही तितकेच रसिक चाहते होते. यशवंतरावांचा हा पैलू लक्षात ठेवून आयोजकांनी चित्रपट, कवी संमेलन व बौद्धिक व्याख्यानाचा समावेश असलेला भरगच्च महोत्सव आयोजित केला होता. ‘हा भारत माझा’ ‘कुटुंब’ व ‘बाई माणूस’ हे तीन चित्रपट, सुप्रसिद्ध कवी व विडंबनकार रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर यांचे ‘हास्यधारा’ कवी संमेलन, डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे ‘यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण’ या विषयावरील व्याख्यान, नामवंत पत्रकार उत्तमराव कांबळे यांचे ‘यशवंतराव चव्हाण एक समाजाभिमुख नेते’ या विषयावरील विचार इ. कार्यक्रमांचा या महोत्सवात समावेश होता. डॉ. मेहेंदळे यांनी आपल्या व्याख्यानात, ‘यशवंतराव हे चिंतन करणारे, लिहिणारे नेते होते. आज पन्नास वर्षांनंतरही ते प्रथम क्रमांकाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरतात. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अल्पशा कारकिर्दीतही त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले,’ असे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या योगदानाचा आढावा घेत, त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर होते. आपल्या भाषणातून यशवंतरावांच्या स्वभावाचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, ‘यशवंतरावांचे मोठेपण या गोष्टीत होते की, ते लहानातल्या लहान कार्यकर्त्यांचे नाव लक्षात ठेवावयाचे व त्याच्या मताची कदर करावयाचे. नामवंत पत्रकार उत्तम कांबळे आपल्या व्याख्यानात म्हणाले की, ‘काही नेते जन्मजात असतात, काही लादलेले असतात, परंतु यशवंतराव हे तिसऱ्याच प्रकारात म्हणजे ‘लोकाभिमुख’ प्रकारात मोडतात. लोकसंग्रह हा त्यांच्या मनाचा कमकुवतपणा होता. शेती, जमीन वाटप, सहकार, शिक्षण, पुरवठा खाते किंवा रेशनिंग इ. अनेक विषयांवर त्यांचे मूलभूत चिंतन असे व त्यानुसार ते शासकीय निर्णय घेत. समितीचे विश्वस्त रा. मो. हेजीब यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सांस्कृतिक समन्वय समितीचे सदस्य प्रफुल्ल पाठक यांनी
वक्त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. विश्वास मेहेंदळे ‘आनंदवनात’
(सुरेंद्र कुलकर्णी)
संपूर्ण मराठी भाषिक कुटुंबे असलेल्या दिल्लीच्या आनंदवन गृहसंकुलात तेथील आनंदवन कल्चरल समितीने ‘देहबोली ते उपग्रहबोली’ या विषयावर डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे भाषण आयोजित केले होते. भरपूर श्रोत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमात डॉ. मेहेंदळे यांनी संवाद साधण्याच्या मानवाच्या पद्धतीत कशी कशी सुधारणा होत गेली व आज उपग्रहाद्वारे चालविल्या जाणाऱ्या यंत्रणेद्वारे माहितीचे प्रसारण कसे जलद झाले आहे हे विविध प्रकारची उदाहरणे देऊन तसेच मनोरंजक किस्से सांगून श्रोत्यांचे प्रबोधन केले. गृहसंकुलाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गावंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी अध्यक्ष अविनाश केतकर यांनी आभार प्रदर्शन केले.

मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलन संपन्न
(सुनील धर्माधिकारी)
मुक्त संवाद ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून इंदूर येथे ‘मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करीत आहे. यंदाच्या तिसऱ्या संमेलनाचे उद्घाटन डॉ. वीणा घाणेकर प्रशासकीय अधिकारी व कवयित्री यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले उपस्थित होत्या. ‘साहित्य, संगीत वा कलेत रमणारा हीच मनुष्याची खरी ओळख असल्याचे’ डॉ. घाणेकर यांनी स्पष्ट केले, तर ‘बदलती वाचन संस्कृती व आपण’ या विषयावर आपले अभ्यासपूर्ण रंजक विचार मंगला गोडबोले यांनी मांडले. ‘वाचन संस्कृती कमी होत नसून तिचे केंद्र फक्त शहराकडून छोटय़ा गावांकडे सरकत असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानात मोठय़ा प्रमाणावर बदल झाल्यामुळे साहित्य दूपर्यंत पोहोचत आहे,’ असेही त्या म्हणाल्या. त्याच दिवशी सायंकाळी रवींद्र नाटय़गृहात कवी संदीप खरे व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपला बहारदार कार्यक्रम ‘आयुष्यावर बोलू काही’ सादर केला. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष संजय पांडे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी भारती ठाकूर यांचे ‘विवेकानंद आणि भगिनी निवेदिता’ या विषयावर व्याख्यान झाले. भगिनी निवेदिता यांच्या जीवनातील अनेक अज्ञात व अल्पज्ञात गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
संमेलनाचा समारोप ‘तंत्रज्ञान व साहित्य’ विषयावर आयोजित  परिसंवादाने झाला. अंतर्नादचे संपादक भानू काळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. प्रकाश दांडेकर, अनुराधा जामदार, प्रा. मिलिंद जोशी यांनी आपले विचार मांडले. मिलिंद दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रकाश दांडेकर यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडत असलेल्या विविध बदलांची माहिती देत या बदलामुळे भाषेवर मर्यादा आल्याचे मान्य करीत, आज एकच शब्द अनेक भाषांतून वापरला जातो असे स्पष्ट केले. ‘साहित्य हे मनुष्याच्या भावभावनांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे छापील साहित्याची महत्ता कधीच कमी होणार नाही,’ असे प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रतिपादन केले. भानू काळे यांनी साहित्याच्या प्रसारणात तंत्रज्ञानाचे महत्त्व मान्य करीत, ‘आज तंत्रज्ञानाचा निर्माता मनुष्य असल्याने साहित्य कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मनुष्याचे रंजन करीत राहील,’ असा विश्वास व्यक्त केला. पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी अरविंद जवळेकर, रेणुका पिंपळे यांनी सांभाळली. आभारप्रदर्शन मोहन रेडगावकर यांनी केले. याप्रसंगी आयोजित दिवाळी अंक व पुस्तक प्रदर्शनाला रसिक वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

कल्पना शुद्धवैशाख यांना जीवनगौरव पुरस्कार
(मोहन रेडगावकर)
ज्येष्ठ कथालेखिका कल्पना शुद्धवैशाख यांना इंदूर येथे मुक्त संवाद संस्थेद्वारा ‘आनंद मोहन माथुर जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.
मध्य प्रदेशात वास्तव्य करीत असताना मराठी साहित्याची निर्मिती करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास हा पुरस्कार देण्यात येतो. इंदूर येथे आयोजित म. प्र. मराठी साहित्य संमेलनात श्रीमती शुद्धवैशाख यांना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले व डॉ. वीणा घाणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व रु. ११ हजार रोख देऊन सन्मानित करण्यात आले.‘मुक्त संवाद’द्वारे हा पुरस्कार म. प्र.चे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल आनंद मोहन माथुर यांच्या सन्मानात हा पुरस्कार गत वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. मेघना निरखीवाले, जयश्री तराणेकर व प्रा. प्रकाश गुप्ते यांनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले.