चीनमधील पहिल्यावहिल्या बिटकॉइन शिखर बैठकीला सरकारच्या धरपकडीच्या कारवाईला न जुमानता अनेकांनी हजेरी लावली. बिटकॉइन हे डिजिटल चलन आहे. भांडवलदार ली झियोलाय यांनी या शिखर बैठकीचे आयोजन केले होते. चीनने डिजिटल चलन वापरू नये ही सूचना त्यांनी फेटाळून लावली आहे.
हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निग पोस्टला त्यांनी सांगितले की, थायलंडने बिटकॉइनवर बंदी घातली आहे, रशियाने बंदी घातली आहे परंतु चीनने त्यावर बंदी घालून काही फायदा नाही कारण सगळे जग त्यावर बंदी घालू शकत नाही. डिसेंबरपासून पीपल्स बँक ऑफ चायनाने डिजिटल चलन वापरणाऱ्यांची धरपकड केली होती. त्यामुळे बिटकॉइन व्यवहारांना धक्का बसला होता. त्याच महिन्यात चीनच्या पोलिसांनी तिघांना बिटकॉइनच्या आधारे ऑनलाइन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याही पुढे जाऊन बिटकॉइन विरोधात आणखी कारवाई करण्याचे सरकारने ठरवले असताना बिटकॉइन व्यापारातील पाच मोठय़ा उद्योगांनी शिखर बैठक भरवली. ली यांनी सांगितले की, आपल्याकडे सहा आकडी बिटकॉइन्स असून आपण अब्जाधीश आहोत. येथे बरेच लोक उपस्थित आहेत हे पाहून आनंद वाटला.
चीनमध्ये बिटकॉइनसाठी सुयोग्य वातावरण तयार करण्याचा इरादा आहे. बिटकॉइन हे अतिशय वेगळेच चलन आहे. चांगले वेतन मिळत असूनही झेंग क्विनेन यांनी नोकरी सोडली ते या मेळाव्यास उपस्थित होते. बिटकॉइन उद्योगात पटकन पैसा मिळू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारची धरपकड योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण सरकारच्या जागी असतो तर हेच केले असते असे सांगून ते म्हणाले की, बिटकॉइनवर र्निबध नसते तर त्यात जोखीम आहे असे कुणी म्हणाले नसते. बिटकॉइनवर कायदेशीर बंदी घातली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सरकारला ते आव्हान आहे असे त्यांनी सांगितले.