केंद्राकडून ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर भुवनेश्वर येथे राजभवनाजवळ ‘बिजु जनता दला’च्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशपासून विभाजन होऊन नव्याने निर्माण झालेल्या सीमांध्र भागाप्रमाणे ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी ‘बीजेडी’ने केली होती. काँग्रेसप्रणीत युपीए सरकार राजकीय फायद्यासाठी जाणूनबुजून राज्यासंदर्भातील धोरणांची आखणी करताना भेदभाव करत असल्याचा आरोप ‘बिजु जनता दला’च्या समर्थकांनी केला आहे. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान म्हणून नाही तर एकट्या काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचे ‘बीजेडी’च्या युवा विभागाचे अध्यक्ष संजय दासबर्मा यांनी सांगितले. ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा नाकारण्यासाठी रघुराम राजन समितीच्या अहवालाचा दाखला सरकारकडून देण्यात येत असेल तर मग सीमांध्राला विशेष राज्याचा दर्जा कसा मिळू शकतो असा सवाल बिजु जनता दलाकडून करण्यात येत आहे.