राज्यसभा उपसभापती निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमधून आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत विजय मिळवता आला असता पण बिजू जनता दलाने (बीजेडी) साथ न दिल्याने पराभव झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून बीजेडीने एनडीएच्या उमेदवाराला मत देऊन आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे म्हटले आहे.

एनडीएने नवीन पटनायक यांच्या पक्षाचा पराभव करणे हे आपले लक्ष्य असल्याचे जाहीर केले आहे. तरीही बीजेडीने त्यांना पाठिंबा देऊन स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. ओडिशात बीजेडी आणि भाजपा एकत्र येऊ शकत नाही. अशावेळी एनडीएच्या उमेदवाराची साथ देऊन त्यांनी आपलेच नुकसान केले आहे, असे त्यांनी म्हटले. राज्यसभा उपसभापतीपदासाठी एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह हे विजयी ठरले. त्यांना १२५ मते मिळाली. तर विरोधी पक्षाचे उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली.

चिदंबरम म्हणाले, जय-पराजय यामध्ये फक्त २० मतांचे अंतर होते. जर बीजेडीने खऱ्या विरोधी पक्षाची भूमिका निभावली असती तर आज निकाल वेगळा दिसला असता. अण्णा द्रमूक भाजपाच्या हातातील बाहुले आहेत हे तामिळनाडूच्या लोकांनाही माहीत आहे.

राज्यसभेत विरोधी पक्षाची एकता पुन्हा एकदा दिसून आली. विरोधी पक्षाचे सर्व १०५ खासदार एकत्र होते. आम्हाला द्रमूकची चार मते मिळाली असती. पण दु:खद घटनेमुळे ते येऊ शकले नाहीत, असे ते म्हणाले. द्रमूक प्रमुख करूणानिधी यांच्या निधनामुळे द्रमूक खासदार मतदानासाठी येऊ शकले नाहीत.