पश्चिम बंगालमध्ये ‘हिंसाचारविरोधी मोर्चा’ला हिंसक वळण

निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराविरोधात भाजपने काढलेल्या मोर्चावेळी भाजप कार्यकर्ते व पोलिस यांच्यात जोरदार धुमश्चक्री   उडाली. भाजप कार्यकर्ते व समर्थकांवर राज्यात मोठय़ा प्रमाणावर हल्ले झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपने काढलेल्या मोर्चावेळी बोबझार चौकात कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात जमले होते. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करून नंतर पाण्याचे फवारे मारले. त्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देत पोलिसांना दगड व बाटल्या फेकून मारल्या. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या निषेधार्थ ठिय्या दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह नवनिर्वाचित अठरा खासदार कोलकाता पोलिस मुख्यालयाच्या दिशेने वेलिंग्टन येथून निघाले.  बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय व पक्षनेते मुकल रॉय हे मोर्चात सहभागी झाले. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला १८ जागा मिळाल्या असून तृणमूलला बावीस जागा मिळाल्या आहेत. उत्तर २४ परगणा येथील संदेशखाली येथील शनिवारची चकमक ममता बॅनर्जी यांच्यामुळेच झाली, असा आरोप मुकुल रॉय यांनी मंगळवारी केला. या चकमकीची एनआयए मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ममता बॅनर्जी यांनी याआधी असा आरोप केला, की भाजप खोटी माहिती पसरवित असून त्यामागे सरकार पाडण्याचा डाव आहे.