झारखंडमध्ये भाजपाने स्वबळावर निवडणूक न लढवता एजेएसयू बरोबर आघाडी केली असती तर, दोन्ही पक्षांना फायदा झाला असता. निवडणूक निकालानंतरच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. भाजपा आणि एजेएसयूने स्वतंत्रपणे झारखंड विधानसभेची निवडणूक लढवली. भाजपा आणि एजेएसयू एकत्र आले असते तर, या आघाडीला ४० जागा मिळाल्या असत्या.

शिवाय झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीच्या जागांमध्येही घट झाली असती. झामुमो आघाडीला ३४ जागांवर समाधान मानावे लागले असते. आघाडी झाल्यास सरकार स्थापनेसाठी भाजपा आघाडीला फक्त काही जागा कमी पडल्या असत्या व चित्र वेगळे असते. भाजपा आणि एजेएसयूला ४१.५ टक्के तर राजद-काँग्रेस-झामुमो आघाडीला ३५.४ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे भाजपा-एजेएसयू एकत्र असते तर त्यांना सहा टक्के जास्त मते मिळाली असती.

झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. भाजपाला आता २५ जागा मिळाल्या आहेत. आघाडी झाली असती तर, भाजपाच्या नऊ जागा आणि एजेएसयूच्या चार जागा वाढल्या असत्या. भाजपा ३४ तर एजेएसयूला ६ जागा मिळाल्या असत्या. या आघाडीचा दुसरा फटका झामुमोला बसला असता. त्यांच्या नऊ आणि काँग्रेसच्या चार जागा कमी झाल्या असत्या. राजदच्या एका जागेवर काहीही परिणाम झाला नसता. एकूण आठ जागांवर एजेएसयूला भाजपापेक्षा जास्त मते मिळाली. यात दोन जागा एजेएसयूने जिंकल्या. अर्थातच निकालानंतरचे हे राजकीय गणित आहे.