पंजाबमध्ये झालेल्या दलित हत्याकांड प्रकरणावरून काँग्रेसने आजही लोकसभेत सरकारला जाब विचारला. या प्रकरणी केंद्र सरकारने पंजाब सरकार बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. या गोंधळातच कामकाज सुरू होते. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस खासदारांना भाजप सदस्यांनी गुलाबपुष्प देऊन ‘गांधीगिरी’ केली. त्यामुळे सभागृहात काही काळ सदस्यांचे मनोरंजन झाले. पंजाबमधील शिरोमणी अकाली दल व भाजप सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला.
प्रश्नोत्तराचा तास गोंधळातच पार पडला. त्यानंतर शून्य प्रहरात शिंदे म्हणाले की, गेल्या अठरा महिन्यांमध्ये दलित व महिलांवर अत्याचार वाढले आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशात दर अठरा मिनिटांनी दलितांवर अत्याचार होतो. दर दिवशी तीन दलित महिलांवर अत्याचार होतो, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. आता तर पंजाबमध्ये दलित महिलेस बसने चिरडून मारण्यात आले. ही बस एखाद्या राजकीय नेत्याच्या मालकीची असल्याचा दावा त्यांनी केला.