झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: मैदानात उतरले आहेत. अमित शाह यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. झारखंडमधील लातेहार येथे प्रचारसभेत बोलताना अमित शाह यांनी राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली. “अयोध्या प्रकरणी काँग्रेसने अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय़ दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता तिथे भव्य राम मंदिर उभारण्यात येणार आहे”.

“अयोध्येत राम मंदिर उभं राहावं अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण अयोध्येत राम मंदिर उभं राहावं अशी इच्छा नसल्याने काँग्रेस या प्रकरणावर सुनावणी होऊ नये असाच प्रयत्न करत होतं. इतरी वर्ष हा निर्णय होत नव्हता. आम्हालादेखील कायदेशीर मार्गाने यामधून तोडगा निघावा असं वाटत होतं आणि प्रभू रामाच्या कृपेने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे अयोध्येत भव्य राम मंदिर उभं करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक निकाल –
राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला.

न्यायालयाने वादग्रस्त जागी राम मंदिर उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेश दिला. या जागेत येत्या तीन महिन्यात मंदिर उभारण्याचे काम सुरू करावे असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पुरातत्व विभागाचे दावे यावेळी न्यायालयाने ग्राह्य धरले. पुरातत्व विभागाच्या उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हायकोर्टानं यासंबंधी दिलेला निकाल पूर्ण पारदर्शी होता, असे खंडपीठानं म्हटले. मशीद रिकाम्या जागी बांधली होती. पण मशिदीखालचा संरचना इस्लामिक नव्हती. मशिदीचं निर्माण मंदिर उद्धवस्त करून करण्यात आलं हे पुरातत्व विभागाला स्थापित करता आलं नाही . हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे. असे न्यायालयानं सांगितले.

वादग्रस्त जागेत १८५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पढण्यात आला नव्हता. त्यापूर्वी याठिकाणी हिंदूकडून पूजा केली जात होती. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. प्रभू रामाचा जन्म याच ठिकाणी झाला होता, अशी हिंदूची श्रद्धा आहे. तर मुस्लीम याला बाबरी मशिद मानतात. श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असंही न्यायालायनं म्हटलं आहे.