केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असून रविवारी रॅलीत बोलताना त्यांनी भाजपा सत्तेत आली तर दिल्ली एक जागतिक दर्जाचं शहर बनवू असं आश्वासन दिलं. तसंच आपण जर असं करण्यात अपयशी ठरलो तर लोक माझे कान उपटू शकतात असंही यावेळी ते म्हणाले. “तुम्ही १५ वर्ष काँग्रेसला आणि पाच वर्ष आम आदमी पक्षाला संधी दिलीत. मी तुम्हाला शब्द देतो की, जर आम्ही सत्तेत आलो तर भाजपाला जागतिक दर्जाचं शहर बनवू. जर तसं झालं नाही तर तुम्ही माझे कान उपटू शकता,” असं अमित शाह यांनी दिल्लीमधील बाबरपूर येथे झालेल्या रॅलीत म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या आयुषमान भारत आरोग्य योजनेची राजधानीत अमलबजावणी न केल्याने यावेळी अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. “दिल्लीत जर कोणी आजारी पडलं आणि उपचारासाठी पैसे नसतील तर त्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा मृत्यू परवडला असं म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुषमान भारत योजनेअंतर्गत सात कोटी लोकांना स्वस्त आणि मोफत उपचार दिले आहेत. पण केजरीवाल सरकारने योजनेची अमलबजावणी करण्यास नकार दिल्याने दिल्लीमधील अनेक भागांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही,” अशी टीका अमित शाह यांनी केली.

“देशभरात अनेक सर्व्हे करण्यात आले. एखादं सरकार स्वच्छ पाण्याच्या बातमीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसरं रस्ते बांधणी सारख्या गोष्टींमध्ये आहे. पण केजरीवाल सरकार फक्त खोटं बोलण्याच्या बातमीत पहिल्या क्रमांकावर आहे,” असा टोला अमित शाह यांनी लगावला. अमित शाह यांनी कलम ३७०, जेएनयू, राम मंदिर आणि सीएएविरोधातील आंदोलनांवरुन आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर टीका केली. आपली मतं कमी होतील या भीतीने दोन्ही पक्ष भाजपा आणि मोदींना विरोध करत आहेत असा आरोप अमित शाह यांनी केला.