जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय पक्षांच्या प्रचारानेही वेग घेतला आहे. जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने राजकीय जाहिरातींचा डेटा जाहीर केला आहे. यात जाहिरातींवर खर्च करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक रक्कम भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्थानिक पक्षानंतर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा क्रमांक लागतो. म्हणजे फेसबुकवर सर्वाधिक खर्च भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केला आहे. या मित्रपक्षांमध्ये असे पक्ष, मंत्री, खासदार, आमदार आणि संघटनांचा समावेश आहे, जे एखाद्या राजकीय पक्षाचे खुलेपणाने समर्थन करतात आणि त्यांचे फेसबुक फॅन पेजेसही तीच कृती करतात.

फेसबुक जाहिरातींवर भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी फेब्रुवारीत २.३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपाने ‘भारत के मन की बात’ या पेजच्या माध्यमातून जाहिरात अभियान चालवले. त्यासाठी त्यांनी फेब्रुवारीत फेसबुकला १.१ कोटी रुपये दिले. आणखी एक पेज ‘नेशन विथ नमो’ने फेब्रुवारीत ६० लाख रुपयांहून अधिक रक्कम जाहिरातींवर खर्च केली आहे.

सर्वाधिक खर्च करणाऱ्यांमध्ये बीजेडीचे नवीन पटनाईकही आघाडीवर आहेत. त्यांनी ३२ जाहिरातींवर ८,६२,९८१ रूपये खर्च केले आहेत. भाजपाचे जयंत सिन्हा, अमित शाह, मुरलीधर राव, नरेंद्र खिचर यांनी २ ते ३ लाख रुपये फेसबुकवरील जाहिरातीसाठी खर्च केले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी फेब्रुवारीमध्ये २ फेसबुक जाहिरातींसाठी दीड लाख रुपये खर्च केले.

प्रादेशिक पक्षांनीही याचदरम्यान जाहिरातींवर १९.८ लाख रूपये खर्च केले. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी १०.६ लाख रुपये खर्च केले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार, निवडणुका संपेपर्यंत सोशल मीडियावर होणारा खर्च पक्षाच्या एकूण जाहिरातीच्या खर्चाच्या २० ते २५ टक्के असेल, असे भाजपा नेत्याने सांगितले आहे.

फेसबुककडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, मायगव्ह (MyGov) सारख्या सरकारी विभाग आणि डिजिटल इंडियासारख्या अभियानावरही ३५ लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. कंपनीने Ad Archive Report अंतर्गत ही माहिती सार्वजनिक केली आहे. ऑक्टोबर २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतात फेसबुकचे सुमारे ३० कोटी युर्जस आहेत.