उत्तर प्रदेशातील वाळू माफियांविरोधात भारतीय जनता पक्ष आवाज उठवतोय. मात्र, मध्य प्रदेशात भाजपच्याच मुख्यमंत्र्यांच्या कृपेवर पोसलेल्या वाळू माफियांवर ते कारवाई करणार का, असा प्रश्न कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सोमवारी उपस्थित केला. आपल्या ट्विटरवर अकाऊंटवर केलेल्या नव्या ट्विटमध्ये दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. दुतोंडीपणामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘मास्टर’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनात भाजपच्या शाहनवाझ हुसेन यांनी उत्तर प्रदेशातील वाळू माफियांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना दिग्विजयसिंह यांनी मध्य प्रदेशातील वाळू माफियांबद्दल प्रश्न उपस्थित केला. भाजप आणि इतर विरोधक संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे चालू देणार का, असा प्रश्न दिग्विजयसिंह यांनी विचारला.
उत्तर प्रदेशातील वाळू माफियांवर कारवाई करणाऱया सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्यावर तेथील राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली. हा विषय सोमवारी संसदेमध्येही उपस्थित करण्यात आला. नागपाल यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी खासदारांनी केली.