News Flash

पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली घोषणा

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आलं आहे. भाजपाने आज राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव ही जबाबदारी देण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातली घोषणा केली.  विधानसभा निवडणुकीच्या वेळी विनोद तावडे यांना तिकिटच मिळाले नव्हते. तर पंकजा मुंडे या निवडणूक हरल्या होत्या. दरम्यान भाजपातले नाराज नेते एकनाथ खडसे यांना मात्र यादीत कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही.

पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघातून पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून धनंजय मुंडे विजयी झाले. या निकालानंतर नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्या पक्षाविरोधात थेट काही बोलल्या नव्हत्या. ज्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेतलं जाईल असं वाटत होतं. मात्र ती चर्चाही फक्त चर्चाच ठरली. या सगळ्या गोष्टींमुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन भाजपाने त्यांची नाराजी दूर केल्याचं बोललं जातं आहे.

फडणवीस सरकारच्या काळात विनोद तावडे शिक्षणमंत्री होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकिट नाकारण्यात आलं होतं. पक्षाच्या या निर्णयामुळे विनोद तावडे हे नाराज होते. मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. तिसरे नाराज नेते एकनाथ खडसे यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. आता एकनाथ खडसे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र यावर प्रतिक्रिया देत मला यातलं काही ठाऊक नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. यामध्ये कर्नाटकातील भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. रमन सिंह, मुकुल रॉय, अन्नपूर्णा देवी, बैजयंत जय पांडा यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मार्चा अध्यक्षपदी आणि राजकुमार चहर यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

त्याचबरोबर भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, सीटी रवी यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 5:20 pm

Web Title: bjp annouces the name of party national office bearers pankja munde and vinod tawde names in the list scj 81
Next Stories
1 भाजपाची नवी टीम जाहीर; तेजस्वी सूर्या युवा मोर्चा अध्यक्ष, मुकुल रॉय राष्ट्रीय उपाध्यक्षपदी
2 सर्व काही स्क्रिप्टेड आहे; मोदींना ‘सपनो का सौदागर’ यासाठीच तर म्हणतात… – दिग्विजय सिंह
3 “चीनमधून करोना आलाय ही गोष्ट कधीच विसरणार नाही, सत्ता मिळाली तर…,” डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Just Now!
X