लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने मंगळवारी दहावी यादी जाहीर केली. उत्तर प्रदेशातील २९ आणि पश्चिम बंगालमधील १० लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्याजागी सत्यदेव पचौरी यांनी कानपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यदेव पचौरी उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.

मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी मिळणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. पक्षाच्या या निर्णयावर मुरली मनोहर जोशी यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने त्यांना हा निर्णय सांगितला त्यामुळे मुरली मनोहर जोशी नाराज होते.

नव्या यादीत भाजपाने केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी यांच्या मतदारसंघांमध्ये अदलाबदली केली आहे. मनेका गांधी यांनी २०१४ साली पिलीभितमधून विजय मिळवला होता. आता त्या सुल्तानपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. २०१४ साली वरुण गांधी सुल्तानपूरमधून निवडून आले होते. ते आता पिलीभितमधून लढणार आहेत.

आज सकाळीच भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुरली मनोहर जोशी यांनी २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वाराणसीची जागा सोडली होती. त्यावेळी त्यांना कानपूरची जागा देण्यात आली होती.