केंद्र सरकारने देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला आहे. शनिवारी यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली. आता देशभरात हा कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी या कायद्याला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अनुराग कश्यप सुरुवातीपासूनच या कायद्याला विरोध करताना दिसत आहे. अनेकदा अनुरागने सरकारवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात अनेक ट्विट अनुरागने केले आहेत. मात्र पहिल्यांदाच भाजपाने या मुद्द्यावर अनुरागवर निशाणा साधला आहे.

काय आहे भाजपाचं म्हणणं?

भाजपाने अनुरागची काही जुनी पत्रे समोर आणळी आहेत. भाजपाने केलेल्या दाव्यानुसार या पत्रांच्या माध्यमातून अनुरागने उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडे निधी मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना हा निधी न मिळाल्याने आता ते सरकारला शिव्या देत आहेत. अनुरागने सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना ट्विटवर काही अपशब्द वापरले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपाने ही टीका केली आहे.

भाजपा प्रवक्त्याचे ट्विट…

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे प्रवक्ते शलभ मणी त्रिपाठी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन अनुरागने राज्य सरकारला पाठवलेली काही पत्रे पोस्ट केली आहे. “पडलेल्या चित्रपटांसाठी सरकारकडून भीक न मिळाल्याने अनुराग कश्यप संतापला असून त्याने शिव्या देण्यास सुरुवात केली आहे,” असं त्रिपाठी यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आधीच्या सरकारवर साधला निशाणा…

अनुरागबरोबर त्रिपाठी यांनी आधीच्या सरकारवरही निशाणा साधला आहे. “आधीच्या सरकारकडून अनुरागच्या पडलेल्या चित्रपाटांना करोडो रुपये देण्यात आले. यश भारती सन्मानच्या नावाखाली सरकारकडून देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले. योगींनी हे पैसे गरीब, विधवा आणि शेतकऱ्यांना वाटले. याचाच त्यांना राग आहे,” असं त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.

अनुरागचे उत्तर…

अनुरागने या आरोपांना ट्विटवरुन उत्तर देताना, “उत्तर प्रदेश सरकारची जाहिरात करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलेल्या चित्रपटाच्या मानधनासंदर्भातील हा पत्रव्यवहार होता,” असं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या आधी सत्तेत असणाऱ्या अखिलेश यादव सरकारकडून राज्यातील कलाकारांना यश भारती सन्मान आणि ५० हजार रुपयांची पेन्शन दिली जायची. मात्र सत्तेमध्ये आल्यानंतर योगींनी हे अनुदान बंद केले.