News Flash

“हिंदूना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल”, भाजपा नेत्याची धमकी

सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं

आखाती देशांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हिंदूंना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल असं वक्तव्य केरलमधील भाजपा प्रवक्ता बी गोपालकृष्णन यांनी केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कायद्याचं समर्थन करणाऱ्या आखाती देशांमधील हिंदूंना काहीजण धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “इंडियन युनिअन मुस्लीम लीगने जातीय घटकांना दूर केलं आहे. मात्र आखाती देशातील काही लोक हिंदूंना धमकावत आहेत. अशा लोकांना पाकिस्तानात जाण्यास भाग पाडलं जाईल”.

बहारीन येथे एका केरळमधील हिंदू नागरिकाने कायद्याचं समर्थन केल्याने त्याच्या मालकीच्या हॉटेलला टार्गेट करण्यात आलं असल्याचं गोपालकृष्ण यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये केरळमधील काही लोकांनाच हॉटेलमध्ये घोषणबाजी करताना दाखवण्यात आलं होतं. सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन केल्यानेच हा निषेध करण्यात आला होता.

केरळ सरकारने एनपीआरच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या निर्णयावर गोपालकृष्णन यांनी नाराजी व्यक्त करत रेशन बंद करण्याची धमकी दिली आहे. “मुख्यमंत्री पी विजयन यांना एनपीआर प्रक्रिया लागू करावीच लागेल. असं नाही झालं तर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राज्याला रेशन मिळणं बंद होईल,” असं गोपालकृष्णन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान केरळमध्ये नागरिकत्व कायद्याचं समर्थन केल्याने एका डॉक्टरला राजीनामा द्यावा लागला असल्याची माहिती समोर आली होती. डॉक्टर अजित श्रीधरन यांनी नागरिकत्व कायद्याचं समर्थन केलं होतं. डॉक्टर अजित श्रीधरन यांच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 9:16 am

Web Title: bjp b gopalakrishnan caa citizenship amendment act hindu gulf countries pakistan sgy 87
Next Stories
1 एअर इंडिया म्हणते आता उधारी बंद! आधी पैसे, मग प्रवास
2 IAF चा पराक्रमी ‘बहादूर’ आज होणार निवृत्त
3 #CAA : पुन्हा आंदोलनाची शक्यता; उ. प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद
Just Now!
X