लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपले सर्वाधिक लक्ष पश्चिम बंगालवर केंद्रीत केले होते. पहिल्याच फेरीपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक जागांवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भाजपाने काँटे की टक्कर दिली होती. त्यातच आसनसोल मतदारसंघातील बाबुल सुप्रियो विरूद्ध मून मून सेन यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यात पुन्हा एकदा बाबुल सुप्रियो यांनी बाजी मारली असून मून मून सेन यांचा जवळपास 1 लाख 97 हजार मतांनी पराभव केला.

मून मून सेन यांच्या पराभवामुळे तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बाबूल सुप्रियो यांना 632727 मते तर मून मून सेन यांना 435584 इतकी मते मिळाली. तर कम्युनिस्ट पार्टीच्या गौरांग चटर्जी यांना 87553 मते मिळाली. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बाबुल सुप्रियो यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांचा 70480 मतांनी विजय झाला होता.

परंतु यावेळी त्यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने मून मून सेन यांना उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची झाली होती. त्यातही बाबुल सुप्रियो यांनी बाजी मारत गेल्या निवडणुकीपेक्षा दुपटीच्या फरकाने मते मिळवत विजय मिळवला. यापूर्वी 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर 2009 मध्ये भाजपाला दार्जिलिंगच्या जागेवर विजय मिळाला होता. तर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीच भाजपाला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता.