शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांच्या अटकेविरोधात भाजपाने येथील पोलीस उपमहासंचालकांच्या घरासमोर पहाटेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील मार्क्सवादी-एलडीएफ सरकारविरोधातही आपले आंदोलन तीव्र केले आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयांवर मोर्चे काढले आहेत.

दरम्यान, येथील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आरोप केला की, मार्क्सवादी पार्टी हा पक्ष दिवाळखोरीत निघाला असून त्यांच्या आलेख हा सातत्याने खाली चालला आहे. ज्येष्ठ मार्क्सवादी नेते एन. एम. लॉवरेन्स यांचे नातू देखील या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान आजवर ३५०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ५२९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाच्या सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन केले जात आहे.

दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शाह हे २७ ऑक्टोबर रोजी म्हणाले होते की, भाजपाचा आंदोलकांना पूर्ण पाठींबा आहे. त्याचबरोबर रिती-रिवाजांचे पालन केले जावे यासाठी ८ ते १३ नोव्हेंबरदरम्यान ‘रथ यात्रा’ काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

सुप्रीम कोर्टाने परंपरेने चालत आलेल्या शबरीमला मंदिरातील महिला प्रवेश बंदीविरोधात निकाल देताना महिलांनाही सर्व मंदिरांमध्ये जाण्याचा हक्क असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात भुमिका घेतली, त्यासाठी आंदोलन सुरु केले. तर केरळ सरकारने कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत महिलांना मंदिर प्रवेशासाठी सुरक्षा पुरवली. तसेच याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून हिंसाचार घडवून आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.