कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळण्यासंदर्भात मोठमोठे दावे करुनही भाजपाला अद्यापपर्यंत हे सरकार पाडता आलेले नाही. पण असे असूनही भाजपाचा विश्वास तूसभरही कमी झालेला नाही. लवकरच तुम्हला जेडीएस-काँग्रेसचे आघाडी सरकार कोसळलेले दिसेल असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुमारस्वामी सरकार कोसळणार हे भाजपा कुठल्या आधारावर म्हणत आहे. त्यामागे काय कारणे आहेत ते आपण समजून घेऊया.

१) सत्तारुढ जेडीएस-काँग्रेस सरकारची लिंगायत आणि उत्तर कर्नाटक विरोधी प्रतिमा तयार झाल्याची भिती काही काँग्रेस आमदारांच्या मनात आहे. लिंगायत समाजाचे वर्चस्व असलेल्या भागातील काँग्रेस आमदारांच्या मनात असुरक्षितेतची भावना असून ते भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

२) देवेगौडा कुटुंबाचे सरकारवरील नियंत्रण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच.डी.रेवण्णा यांचा दुसऱ्या खात्यांमधील हस्तक्षेप यामुळे काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदारांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिक आमदार आणि मंत्र्यांना विश्वासात घेतल्याशिवाय अनेक जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सातत्याने करण्यात येणाऱ्या तक्रारींकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नाराजी वाढू लागली आहे.

३) भाजपा नेते आपले सरकार पाडण्याचे कारस्थान रचत आहेत असा आरोप मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे. पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनाही पद हवे आहे. सत्तेसाठी हे आमदार अत्यंत आतुर आहेत. डझनभर काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

४) जारकीहोली बंधु आणि डी.के.शिवकुमार यांच्यातील वाढत्या मतभेदांमुळे सरकार पाडण्यास हातभारच लागेल असा भाजपा नेत्यांना विश्वास आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि होसाकोटेचे आमदार नागराज यांच्यातही मतभेद आहेत.

५) एकूणच कर्नाटकातील या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाला फायदाच होणार असून त्यामुळे कुमारस्वामी सरकार पाडण्याचे आमचे काम अधिक सोपे होईल असे भाजपामधील एका मोठया नेत्याने खासगीमध्ये सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp belive on destabilising kumaraswamy government
First published on: 18-09-2018 at 16:37 IST