News Flash

‘नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश’, भाजपाचे ट्विट

राहुल गांधीच्या ट्विटला भाजपाने दिले उत्तर

‘नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश’, भाजपाचे ट्विट
भाजपाचे ट्विट

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे मसूदला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी भारताने केलेली मोर्चेबांधणी अयशस्वी ठरली आहे. आंतरारष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींचे पडसाद आता भारतीय राजकाराण उमटू लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात असा टोला त्यांनी लगावला आहे. मसूद अझहरला दोषी न ठरवता येण्यासाठी अप्रत्यक्षपणे तुमचे पणजोबा म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुच जबाबदार असल्याचे भाजपाने राहुल गांधींच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे.

मसदूर अझहरला दहशतवादी ठरवण्याचे भारताचे प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टिका केली. ‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतं तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही,’ असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी ‘गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्याबरोबर झोके घेणे, दिल्लीत भटकणे आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकणे हीच मोदींची चीनबरोबरची कुटनिती आहे,’ असंही म्हटलं आहे.

राहुल गांधीच्या याच ट्विटला भाजपाने त्यांचे ट्विट कोट करत उत्तर दिले आहे. राहुल यांचे पणजोबा म्हणजेच जवाहरलाल नेहरुंमुळे चीनला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व मिळाल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. ‘जर तुमच्या पणजोबांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाची भारता मिळत असलेली स्थायी सदस्यत्वाची जागा चीनला भेट म्हणून दिली नसती तर चीन आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळामध्ये नसता. तुमच्या कुटुंबाने केलेल्या सर्व चुका भारत दुरुस्त करत आहे. भारत दहशतवादाविरुद्धची लढाई नक्कीच जिंकेल. हा विषय मोदींवर सोडून तुम्ही चीनच्या शिष्टमंडळांना गुप्तपणे भेटणे सुरु ठेवा,’ असा टोला भाजपाने आपल्या ट्विटमधून राहुल गांधी यांना लगावला आहे.

दरम्यान, मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाची मुदत १३ मार्चला संपणार होती. त्याआधीच भारताने अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटून मोर्चेबांधणी केली होती. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने या वेळी त्याला वेगळे महत्त्व होते. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टन येथे अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेऊन चर्चा केली होती, त्यात दहशतवादाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारताच्या मोर्चेबांधणीला यशही आले होते. १० हून अधिक देशांनी या प्रस्तावात भारताची साथ दिल्याचे समजते. पण चीनने खोडा घातल्याचे समोर आले आहे. नकाराधिकाराचा वापर केल्याची ही चौथी वेळ आहे. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानसोबत चीनचे चांगले संबंध आहे. यापूर्वी चीनने अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर २००९, २०१६, २०१७ असा तीनदा नकाराधिकार वापरला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही चीनचा निर्णय निराशाजनक असल्याचे आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 12:58 pm

Web Title: bjp blame nehru as un security councils fails to declare jaish e mohammad chief masood azhar a global terrorist
Next Stories
1 भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक
2 #BoycottChineseProducts: ‘दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या चीनला धडा शिकवा, चीनी वस्तूंवर बंदी घाला’
3 भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर
Just Now!
X