संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप खासदार व केंद्रीयमंत्र्यांना उपस्थित राहण्याची सक्ती केलेल्या चौक सभांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापूर्वीच प्रदेश भाजपने पक्षाचे ‘ब्रॅण्ड प्रचारक’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामलीलावर भव्य सभा आयोजित केल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. अशाच प्रकारच्या चौक सभा आम आदमी पक्ष घेत आहे. त्यात अरविंद केजरीवाल यांचा अपवाद वगळता अन्य नेत्यांच्या सभांनादेखील गर्दी होत नाही. त्यामुळे मतदारांऐवजी कार्यकर्त्यांमध्येच उत्साह भरण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केल्याचे पक्ष सूत्रांचे म्हणणे आहे.    
दिल्लीच्या रामलीला मैदानावरील मोदींच्या सभेला युवकांची विशेष गर्दी होती. सकाळी दहा वाजेपासूनच भाजप समर्थकांचे जथे रामलीलाच्या दिशेने येत होते. मैदानभर मोदी, भाजप, अमित शहा यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स लावण्यात आली होती. रामलीला मैदानानजीक असलेले नवी दिल्ली मेट्रो स्टेशन बंद असल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. सकाळी दहा वाजेपासून सभास्थानी पोहोचलेल्या गर्दीत साडेबारा वाजता पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर जणू काही चैतन्य पसरले. व्यासपीठावर बसलेले केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू, डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही थंडीचा त्रास जाणवत होता, परंतु अत्यंत हसतमुख चेहऱ्याने ते परस्परांशी बोलत होते.
मोदींनी आपल्या भाषणात ‘अमित शहा आजपर्यंतचे सर्वाधिक यशस्वी भाजपाध्यक्ष’ असल्याची पावती दिल्यावर व्यासपीठावरील सर्वानीच टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय यांचा वारसा व जनसंघ ते भाजपच्या वाटचालीत आलेल्या यशाचे सारे श्रेय अमित शहा यांना देऊन मोदी यांनी एकप्रकारे पक्षांतर्गत शहा विरोधकांना गप्प केल्याची चर्चा त्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा सत्कार या वेळी प्रदेश भाजपकडून करण्यात आला. सामान्य कुटुंबातील व्यक्ती भाजपमध्ये राहून मुख्यमंत्रिपदावर पोहोचली, असा संदेश त्यातून पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून दिला. तत्पूर्वी मोदी भाषणात काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. काँग्रेसचा उल्लेख तर सोडाच, नामोल्लेखही न करता मोदींनी टीका केली नाही, मात्र ‘आप’वर त्यांनी कुणाचेही नाव न घेता निशाणा साधला. त्यामुळे दिल्लीत खरी लढाई भाजप विरुद्ध आपमध्येच असल्याचे अधोरेखित झाले. व्यासपीठावरील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार जगदीश मुखी यांना डावलून उमेदवारी मागणारे आशीष सूद हे उपस्थित होते.