पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पुन्हा एकदा सत्ता आल्यामुळे साहजिकच समर्थक आणि मतदारांमध्येही आनंदाचे वातावरण असून प्रत्येकजण हा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. मुख्य म्हणजे हा आनंद साजरा करत असताना विविध प्रतिकात्मक मार्गांनी काँग्रेसवरही निशाणा साधण्यात आल्याचे पाहायला मिळतेय. याचेच एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. कारण, भाजप नेते तेजिंदर बग्गा यांनी चक्क मशरुमचा केक आणत आपला आनंद व्यक्त केला आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणामध्ये काही दिवसांपूर्वीच काँग्रेमध्ये प्रवेश केलेल्या अल्पेश ठाकोर यांनी मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी गोरेपणासाठी रोजच्या आहारात ४ लाखांचे मशरुम खातात असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर मोदी समर्थकांनी ठाकोर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या बेताल वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणूनच बग्गा यांनी थेट मशरुमचाच केक आणत अनोख्या पद्धतीने पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

Gujarat Himachal Pradesh Election results 2017 : जो जीता वही सिकंदर- स्मृती इराणी

ठाकोर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही मशरुमच्याच चर्चा पाहायला मिळाल्या. मोदी खात असलेले मशरुम हे तैवानहून मागवले जातात असेही ते म्हणाले होते. त्यामुळे एका तैवानी महिलेने तुमच्या देशाच्या राजकारणात तैवानला घुसवू नका, असा सल्लाही दिला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एकंदर पार्श्वभूमी पाहता बग्गा यांचा मशरुम केक सध्या बराच चर्चेत आला आहे.