राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रिया देशभरात लागू करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचं भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच २०२४ लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपा प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याला भारताबाहेर हाकलून काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हरियाणामधील कैथल जिल्ह्यातील प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्रासोबत हरियाणातही २१ ऑक्टोबरला निवडणूक पार पडणार आहे.

यावेळी बोलताना अमित शाह यांनी सांगितलं की, “कलम ३७० रद्द करण्यासाठी मोदींनी हिंमत दाखवली, तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी मोदींनी हिंमत दाखवली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, २०२४ मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा तुमच्याकडे मतं मागण्यासाठी येऊ त्याच्याआधी देशात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येकाला भारताबाहेर काढण्याचं काम हे सरकार करणार”.

“गेल्या ७० वर्षांपासून निर्वासित बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करत असून देशाची सुरक्षा दुबळी करण्याचं काम करत आहे. भाजपा सरकारचा तसंच नरेंद्र मोदींचा एनआरसीच्या माध्यमातून या घुसखोरांना देशाच्या बाहेर काढण्याचा संकल्प आहे,” असंही यावेळी अमित शाह यांनी सांगितलं. यावेळी अमित शाह यांनी लोकांना काँग्रेसला तिहेरी तलाक तसंच ३७० कलम रद्द करण्याला विरोध का केला अशी विचारणा करण्याचं आवाहन केलं. गेल्या महिन्यात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणातही एनआरसी प्रक्रिया राबवली जाईल असं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ करणाऱ्या अमित शाह यांच्या एकूण तीन सभा पार पडल्या. यावेळी त्यांनी देशहितासाठी भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयांचा विरोध केल्याबद्दल काँग्रेसवर जोरदार टीका केली. गांधी, हुडा आणि चौटाला कुंटुंबांवर निशाणा साधत त्यांनी ही कुटुंब देशहित नाही तर कुटंबाच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप केला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सभेत अमित शाह यांनी लोकांना ३७० कलम रद्द केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असून नरेंद्र मोदींचे आभार मानण्याची संधी असल्याचं सांगितलं.