पश्चिम बंगालमधील जनतेने मतदानाच्या पहिल्या चार टप्प्यांत इतके चौकार आणि षटकार ठोकले आहेत की भाजपचे शतक पूर्ण झाले आहे आणि राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस हद्दपार होण्याच्या बेतात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सांगितले. वर्धमान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते.

ममता यांच्या अत्यंत जवळच्या एका नेत्याने अनुसूचित जातींचा भिकारी असा उल्लेख केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त करण्याची तसदीही घेतली नाही, असेही मोदी म्हणाले.

राज्यातील जनतेने मतदानाच्या पहिल्या चार टप्प्यांत इतके चौकार आणि षटकार ठोकले आहेत की भाजपने अगोदरच शतक पूर्ण केले आहे. जनतेने तृणमूल काँग्रेसला निम्म्यातच साफ केले आहे, जनतेने नंदीग्राममध्ये ममतांना त्रिफळाचीत केले असून त्यांच्या संपूर्ण संघाला मैदान सोडून जाण्यास सांगितले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्या ‘माँ, माटी, मानुष’ घोषणेची मोदींनी खिल्ली उडविली. ममतांनी माँचा छळ केला, मातृभूमीची (माटी) लूट केली आणि जनतेचा (मानुष) रक्तपात केला ही वस्तुस्थिती आहे. दलितांचा अपमान करून ममतांनी मोठे पाप केले आहे, असेही मोदी म्हणाले.