भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आठ महिन्यांनी जयप्रकाश नड्डा यांनी शनिवारी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यात मोदी-शहांच्या विश्वासातील सदस्यांचे स्थान कायम ठेवण्यात आले असले तरी, राम माधव, पी. मुरलीधर राव, अनिल जैन आणि सरोज पांडे यांना महासचिवपदावरून हटवण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू भूपेंद्र यादव यांच्यासह अरुण सिंह, कैलास विजयवर्गीय हे तिघे नड्डांच्या चमूतही महासचिवपदी असतील. महासचिवपदी पाच नवे चेहरे दिसतील. त्यात आंध्र प्रदेशमध्ये संघटना मजबूत करण्याच्या हेतूने एन टी रामाराव यांच्या कन्या पुरंदेश्वरी यांचा समावेश आहे.

सरोज पांडे यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. पंजाब डोळ्यासमोर ठेवून तरुण चुग यांना महासचिवपदी बढती देण्यात आली आहे. दुष्यंत गौतम, सी टी रवी आणि दिलीप सैकिया हे दिल्ली, कर्नाटक आणि आसाममधील नेते नवे महासचिव असतील.

शहांचे दुसरे निकटवर्तीय अनिल बलुनी यांना मुख्य प्रवक्तेपदी बढती देण्यात आली असून माध्यम प्रभारीपदी ते कायम राहतील. भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे अमित मालवीय हेही त्याच पदावर असतील. उत्तर प्रदेशचे राजेश अगरवाल भाजपचे नवे खजिनदार असतील. बी. एल. संतोष यांच्याकडे संघटना महासचिवपदाची जबाबदारी कायम असेल.

तेजस्वी सूर्या युवा मोर्चा प्रमुख

भाजपच्या संघटनात्मक फेरबदलात सर्वात मोठा लाभ कर्नाटकमधील तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांना झाला आहे. त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी खासदार पूनम महाजन यांच्याकडे होती.

बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलातून भाजपमध्ये आलेले अनुक्रमे बैजयंत जय पांडा, मुकुल राय आणि अन्नपूर्ण देवी यांना थेट उपाध्यक्षपदी बसवण्यात आले आहे. पक्षाच्या १२ उपाध्यक्षांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, रमण सिंह, रघुबर दास आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. शहांच्या चमूत उपाध्यक्ष असलेले विनय सहस्रबुद्धे, प्रभात झा आणि ओम माथूर यांना नड्डांच्या चमूत स्थान दिलेले नाही.

पक्षाच्या १३ राष्ट्रीय सचिवांमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची वर्णी लागली आहे. तीन राष्ट्रीय संयुक्त संघटना महासचिवांमध्ये व्ही. सतीश यांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉक्टर लक्ष्मण यांच्याकडे ओबीसी मोर्चा, राजकुमार चाहर यांच्याकडे किसान मोर्चा, लालसिंह आर्य यांच्याकडे एससी मोर्चा, समीर ओरांव यांच्याकडे एसटी मोर्चा आणि जमाल सिद्दिकी यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रवक्त्यांची संख्या २३ करण्यात आली असून संबित पात्रा, सुधांशू त्रिवेदी, शाहनवाझ हुसेन, गौरव भाटिया, नलिन कोहली, नूपुर शर्मा आदी प्रवक्तेपदी कायम राहिले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले टॉम वडक्कन यांनाही प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली असून महाराष्ट्रातून संजू वर्मा आणि हीना गावित यांचाही समावेश आहे.

जमाल सिद्धीकी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुख

राष्ट्रीय कार्यकारिणीत माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. याबरोबरच ईशान्य भारतात पक्षवाढीसाठी काम करणारे सुनील देवधर आणि महिला नेत्या विजया रहाटकर यांनाही सचिवपद देण्यात आले आहे. अशारितीने महाराष्ट्रातील चार जणांना सचिवपदाची जबाबदारी मिळाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन शिक्षणमंत्री असूनही विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या थोडय़ा बाजूला पडल्या होत्या. राष्ट्रीय सचिवपदाच्या यादीत पहिलेच नाव विनोद तावडे यांचे ठेवत पक्षसंघटनेत त्यांच्या अनुभवाचा मान ठेवला जात असल्याचा संदेश देण्यात आला आहे. तर पंकजा मुंडे यांचे नाव सुनील देवधर यांच्यानंतर आहे. राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे एके काळचे स्पर्धक मानले गेलेल्या तावडे व मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन सूचक संदेशही पक्षाने दिला आहे. नागपूरचे जमाल सिद्दीकी यांना राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. प्रवक्त्यांच्या यादीत मुंबईच्या श्रीमती संजू वर्मा आणि नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांच्या रूपाने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. तर व्ही. सतीश यांच्याकडे सहसंघटनमंत्रीपदाची जबाबदारी कायम राहिली आहे.

मुंडे, तावडे राष्ट्रीय सचिवपदी

राज्यातील विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे आणि विधानसभा व विधान परिषदेसाठी देखील डावलले गेलेले विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त करून पक्षांतर्गत धुसफुस शमविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय नेतृत्वाने केला आहे. विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांच्यावरील पक्षनेतृत्वाचा विश्वास कायम असल्याने त्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता

भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल शक्यता आहे. याशिवाय, भाजपच्या संसदीय मंडळाचीही फेररचना अपेक्षित आहे. अनंतकुमार, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या निधनामुळे नव्या सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याची वर्णी लागते, याकडे राज्यातील भाजप नेत्यांचे लक्ष आहे.