‘मूडीज’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेने भारताच्या पतमानांकनामध्ये वाढ केल्याने भाजपच्या गोटामध्ये शुक्रवारी उत्साहाचे वातावरण पसरले. या पतवाढीमुळे अर्थव्यवस्थेबाबतच्या विरोधकांच्या तीक्ष्ण बोचकाऱ्यांची धार बोथट होण्याची आशा भाजपला वाटते आहे.

‘नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था कूस बदलत असताना ज्यांनी शंका घेतल्या, त्यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण केल्यास बरे होईल,’ असे बोचकारे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काढले. ‘मूडी’चा अहवाल आल्यापाठोपाठ अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र रंगविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकच लगबग उडाली होती. स्वत: जेटलींनी सकाळी तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली आणि अर्थव्यवस्थेवरून सरकारला घेरणाऱ्या विरोधकांवर बाजी पलटविण्याचा प्रयत्न केला. पक्षाध्यक्ष अमित शहांनी स्वतंत्र पत्रकच काढून मोदींचे अभिनंदन केले.  ‘या पतमानांकन वाढीला एका संकुचित दृष्टिकोनातून पाहू नका आणि त्याला निवडणुकांशीही जोडू नका. गेल्या तीन वर्षांत नोटाबंदी ते डिजिटायजेशनपर्यंत केलेल्या मूलभूत आर्थिक सुधारणांची ही फलनिष्पत्ती आहे आणि ती तेरा वर्षांनंतर फळास आली आहे. आमच्याएवढी वित्तीय शिस्त यापूर्वी कधी पाळली गेली नसावी. पायाभूत सुविधांच्या निर्मितीमधून विकासाची फळे सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आराखडा आमचा आहे. आम्ही स्वीकारलेल्या धोरणांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळत असल्याचा आनंद मोठा आहे,’ असे जेटली म्हणाले.

काँग्रेसची ‘मूडी’वरच टीका

नोटाबंदीनंतर ५.७ टक्क्यांवर आलेला विकासदर, घाईघाईने राबविलेल्या वस्तू व सेवा कराने (जीएसटी) व्यापाऱ्यांची उडालेली त्रेधातिरपीट, बेरोजगारी आणि काही राज्यांमधील कृषिसंकट यावरून विरोधकांचे विशेषत: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे मोदी सरकारवर जबरदस्त प्रहार चालू आहेत. मात्र, जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही निर्देशांकात (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) भारताने एकदम तीस अंकांच्या मारलेल्या हनुमान उडीमुळे भाजपला आर्थिक आघाडीवर जराशी उसंत मिळाली होती. आता तेरा वर्षांनंतर पतमानांकनात वाढ झाल्याने तर भाजपला आनंदाचे भरते आले आहे. या सर्वाद्वारे ‘फील गुड’ वातावरणाची निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे ‘मूडीज’च्या दर्जावाढीने आपल्या हल्ल्यांमधील जान निघून जाण्याच्या शक्यतेने काँग्रेसने ‘मूडीज’वरच हल्ला चढविला. मोदी आणि मूडीज ही जोडी अपयशी ठरली असल्याची टिप्पणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवालांनी केली. ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’च्या वेळेसही काँग्रेसने जागतिक बँकेवरच टीका केली. परदेशी संस्थेच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याची टिप्पणी राहुल गांधींनी केली होती.

भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्यानंतर विश्वासार्हता मिळविण्यासाठी मोदींची धावाधाव चालू आहे. उपासमारीने मृत्यू, शेतकऱ्यांवर गोळीबार, कृषिसंकट, बेरोजगारी, घसरलेले पतमानांकन, रखडलेला विकासदर, घाईघाईने अमलात आणलेला वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीचे भीषण परिणाम आदींचे मोजमाप व्हायला हवे होते.. पण मोदी आणि ‘मूडीज’ यांची जोड अपयशी ठरलीय..  – रणदीप सुर्जेवाला, काँग्रेस प्रवक्ते