पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने गुन्हे आणि दहशतीचा अवलंब केल्याचा आरोप भाजपने केला असून निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. यापूर्वीही अशी विनंती करण्यात आली होती मात्र आयोगाने त्याची दखल घेतली नाही, असेही भाजपने म्हटले आहे.

भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले.

निवडणूक निरीक्षक कोठेही दिसले नाहीत अथवा ते उपलब्धही झाले नाहीत, त्यांच्याशी कोणताही संपर्कच झाला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वीही अशा प्रकारे अनेकदा आयोगाला विनंती करण्यात आली होती, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, आता आयोगाने दखल घ्यावी आणि कोणती कारवाई केली ते भाजपला सांगावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

संवेदनक्षम आणि अतिसंवेदनक्षम मतदारसंघात ध्वजसंचलन करावे, अशी विनंतीही करण्यात आली होती, परंतु आयोगाने आश्वासन देऊनही ध्वजसंचलन करण्यात आले नाही, असे निवेदनात म्हटले असून त्यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची सही आहे.