पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गोव्यात ‘आप’चा प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली. काँग्रेस आणि भाजप यांच्यात एकमेकांविरुद्ध कृती न करण्याचा अलिखित समझोता झाला असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.

काँग्रेस आणि भाजपमध्ये पती-पत्नीसारखे नाते आहे, असे वाटते. श्री आणि श्रीमती भाजप-काँग्रेस, घरात भांडणाऱ्या पती-पत्नीसारखे ते आहेत, त्यांना एकमेकांची गुपिते माहिती आहेत, असे केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले.

गोवा विधानसभा निवडणुकीत आपच्या प्रचाराचा केजरीवाल यांनी रविवारी येथे नारळ फोडला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांच्या अनेक फायली आहेत, मात्र ते त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाहीत, या फायलींच्या आधारे ते काँग्रेसला धमक्या देत राहणार, असे केजरीवाल म्हणाले.

भाजप आणि काँग्रेस यांचे संबंध उत्तम असून ते जनतेला मूर्ख बनवीत आहेत, असेही ते म्हणाले.

दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे जनतेला लुटले आहे, दोन्ही पक्ष माफिया आहेत, ते माफियाराज चालवितात, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.