पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूरमधील सभेत काँग्रेसला ‘बैल गाडी’ (बेल) म्हणत टीका केली होती. काँग्रेसने या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद आणि कपिल सिब्बल यांनीही भाजपाला एक नवे नाव दिले आहे. अहमद यांनी भाजपाला ‘जेल गाडी’ म्हटले तर सिब्बल यांनी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी आरोपींचे स्वागत केल्याचा उल्लेख करत भाजपाला ‘लिंच पुजारी’ असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला बेल गाडी म्हटले. कारण काँग्रेसचे काही नेते जामिनावर बाहेर आहेत. त्याचपद्धतीने भाजपा जेल गाडी झाली आहे. भाजपाचे किमान दोन अध्यक्ष (एक माजी आणि एक विद्यमान) न्यायालयाच्या आदेशावरून कारागृहात गेले होते. कारागृहात जाण्यापेक्षा जामीन (बेल) चांगले मानले जाते, असा टोला शकील अहमद यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला.

तर दुसरीकडे काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले की, जामिनावर बाहेर आलेल्या लिचिंग (जमावाकडून करण्यात येणारी हत्या) प्रकरणातील ८ आरोपींचे जयंत सिन्हा यांनी स्वागत केले. मोदीजी तुमच्या पक्षाला लोक आता लिंच पुजारी म्हणत आहेत.

गतवर्षी झारखंडमधील रामगड येथे मांस व्यापारी मोहम्मद अलिमुद्दीनची जमावाने गोहत्याच्या संशयामुळे हत्या केली होती. याप्रकरणी जलदगती न्यायालयाने याचवर्षी मार्च महिन्यात ११ लोकांना दोषी ठरवले होते. पण मागील आठवड्यात रांची उच्च न्यायालयाने यातील ८ जणांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत जामिनावर सोडले होते. त्यानंतर जयंत सिन्हा यांचे एक छायाचित्र समोर आले होते. त्यात सिन्हा हे या आरोपींचे स्वागत करताना दिसत होते.

कायदा याप्रकरणी आपले काम करेल. जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा मिळेल आणि जे निर्दोष असतील ते मुक्त होतील. कोणालाच कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत सिन्हा यांनी नंतर दिली.