News Flash

‘संपूर्ण क्रांती’च्या आठवणी आणीबाणीविरोधी नेत्यांनी जागवल्या!

सत्तास्थापनेनंतर भाजपने पहिल्यांदाच जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रम दिल्लीत करून आणीबाणीविरोधी आंदोलनकर्त्यां नेत्यांचा सत्कार केला.

काँग्रेसशी युतीवरून भाजपचे नितीशकुमार-लालूप्रसादांवर टीकास्त्र

काँग्रेसशी युतीवरून भाजपचे नितीशकुमार-लालूप्रसादांवर टीकास्त्र
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या ११३व्या जयंतीनिमित्त काँग्रेसविरोधी पक्षाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून भाजपने बिहार निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रविवारी पुन्हा ‘संपूर्ण क्रांती’ची साद दिली. जेपींच्या विचारांचा वारसा सांगणारे नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव यांच्यावर नाव न घेता टीका करीत ‘आणीबाणीला विरोध करणारे आज काँग्रेसच्या हातात हात घालून फिरत आहेत’, अशा शब्दात संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी हल्ला चढविला.
सत्तास्थापनेनंतर भाजपने पहिल्यांदाच जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रम दिल्लीत करून आणीबाणीविरोधी आंदोलनकर्त्यां नेत्यांचा सत्कार केला. त्यात होते ज्येष्ठ भाजपनेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. डी. पी. त्रिपाठी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली, ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्र कपूर तसेच डॉ. सुब्रमण्यम स्वामी!
‘आणीबाणी लादली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देशापेक्षा परदेशात स्वत:ची प्रतिमा काय आहे, याची चिंता होती. त्यामुळे परदेशात त्यांच्याविरोधात वातावरणनिर्मितीसाठी झटले ते डॉ. सुब्रमण्यम स्वामी’- अशी आठवण खुद्द नरेंद्र मोदी यांनीच सांगितली. आणीबाणीदरम्यान एकदा स्वामी वेष बदलून राज्यसभेत आले. त्यांना कुणीही ओळखले नाही. ते आले नि स्वाक्षरी करून थेट परदेशात जाण्यासाठी विमानतळावर रवाना झाले. स्वामी कुठून आले नि कुठून गेले- याचाच विचार सारे काँग्रेसनेते करीत राहिले, पण स्वामी हाती आले नाहीत. मोदी म्हणाले की, बंगळुरूहून अडवाणी यांना पोलीस बंदोबस्तात राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरण्यासाठी गुजरातमध्ये आणले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मी गेलो होतो. मोठय़ा नेत्यांचा त्या वेळी सहवास लाभला.
गुजरातमध्ये आणीबाणीच्या काळात फिरत असताना सामान्यांची भावना कळत होती. बसमध्ये तिकिटाचे उरलेले पैसे परत घेताना महिलेने एक रुपयाची कोरी करकरीत नोट देण्याची विनंती केली. कंडक्टरने नोट दिली पण ती जुनाट होती. महिला आपल्या मागणीवर अडून बसली. तेव्हा मी कंडक्टरने दिलेली नोट चांगली असल्याचे सांगून मध्यस्थीचा प्रयत्न केला. तेव्हा ती महिला म्हणाली- हा एक रुपया मला जेपींच्या आंदोलनासाठी द्यायचा आहे. त्यासाठी मला करकरीत नोट हवी आहे!
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे स्वत:हून अटक करवून घेणारे पहिले नेते होते. ते म्हणाले की, जेव्हा आणीबाणीची घोषणा झाली तेव्हा आम्ही स्वत:हून निषेध मोर्चा काढून अटक करवून घ्यायचे ठरविले. पहिल्याच दिवशी शिरोमणी अकाली दलाच्या सहा जणांना अटक झाली होती. सलग दोन दशके राजकीय तुरुंगवास भोगणारे प्रकाशसिंह बादल हे भारताचे नेल्सन मंडेला आहेत- अशा शब्दात मोदी यांनी त्यांचा गौरव केला.

रामनाथ गोएंकांचा गौरव
इंडियन एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांनी आणीबाणीविरोधी लढय़ात दिलेल्या योगदानाचा सन्मानपूर्वक उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी भाषणादरम्यान केला. शहरी विकासमंत्री वेंकय्या नायडू म्हणाले की, आणीबाणीला विरोध केला म्हणून गोएंका यांना अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा निर्धार ठाम होता. गोयंका म्हणाले होते- ‘मी गावाहून केवळ एक तांब्या घेऊन आलो आहे; मी तोच घेऊन परत जाईन, मात्र आणीबाणीविरोधी लढा देत राहीन!’ पंतप्रधानांनी (इंदिरा गांधी) धमकावल्यावरही गोएंका शरण गेले नाहीत. आज आपल्या देशाला अशाच दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे, अशी भावना नायडू यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 1:21 am

Web Title: bjp congress come together for gaoinka birth anniversary
Next Stories
1 बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान
2 ऑस्ट्रेलिया भारताला बुद्धाचे वालुकाश्म शिल्प परत देणार
3 लंडन-अहमदाबाद थेट विमानसेवेसाठी नरेंद्र मोदींना साकडे