आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतील जाहीर सभेत भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधत दोन्ही पक्षांची ‘मिली भगत’ असल्याचे म्हटले. तसेच मोदींविरोधात निवणूक लढण्याचे आव्हान केजरीवाल यांनी स्वीकारले आणि लोकसभा निवडणूकीत वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.
केजरीवाल म्हणाले की, “काँग्रेसने कधीही भाजप नेत्यांविरोधात काळे झेंडे दाखविले नाहीत, भाजपनेही कधी काँग्रेस नेत्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखविले नाहीत, पण मी आज वाराणसीत दाखल झालो तेव्हा भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काळे झेंडे दाखविले. यावरूनच दोन्ही पक्षांचे एकमेकांशी साटंलोटं असल्याचे दिसून येते.” असेही केजरीवाल म्हणाले.
प्रत्येकवेळी भाजप किंवा काँग्रेस याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने या दोन्ही पक्षांचा भ्रष्टाचाराचा धंदा सुरू होता आता आम आदमी पक्ष भ्रष्टाचारमुक्त राजकारण करण्यास आल्याने या दोघांचाही जळफळाट झाला आहे. त्यामुळे मला काळे झेंडे दाखविण्यात आले, कारण शाई फेकणारे लोक वाराणसीत राहत नाहीत, भाड्याने आणलेल्या लोकांकडून शाई फेकण्यात आल्याचे केजरीवाल म्हणाले.
त्याचबरोबर खासदार व्हायचे हे माझे उद्दीष्ट असते, तर मी सुरक्षित मतदार संघ निवडला असता. आज भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार सुरक्षित मतदार संघ निवडण्यामागे लागले आहेत. देशाला लुटणा-यांना हरवण्यासाठी निवडणुका लढवल्या जातात. असे म्हणून मोदींविरोधात वाराणसीतून लढणार असल्याचे केजरीवालांनी जाहीर केले.

मोदींवर निशाणा-
वाराणसी या नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदार संघात केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधत गुजरात राज्यातील ‘देखावी’ विकासाबाबत खुलासे त्यांनी केले.
नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले असल्याचीही माहिती केजरीवालांनी दिली. मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या. त्यामुळे मोदींना मत दिल्यास शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील असे सांगत निवडणूकीत वाराणसीत मोदींचा पराभव करा असे आवाहन केजरीवाल यांनी वाराणसीकरांना केले.

अंबानी बंधूंचे स्विस बँकेतील खातेक्रमांक-
अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळापैसा असल्याचा खळबळजनक खुलासा केजरीवाल यांनी केला. तसेच अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले-
खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४
 
केजरीवालांचे वाग्बाण-
* याच मैदानावर मी मोदींना खुल्या चर्चेचे निमंत्रण देतो. जर ते आले नाहीत तर समजा, ‘दाल मे कुछ काला है’.
* आपली ‘पोल-खोल’ होईल म्हणून मोदी केव्हाच माध्यमांना सामोरे जात नाहीत
* मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात
* नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील
* देशाला लुटणा-यांना हरवण्यासाठी निवडणुका लढवल्या जातात. म्हणून नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढणार
* देशातील जनतेला वाचवण्यासाठी मोदी आपली इतर पक्षांसोबतची युती तोडतील का?