भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार घडला आहे. भाजपा नगरसेवकाने जेव्हा पोलिसाला मारहाण केली तेव्हा तो वर्दीत होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुनिष कुमार असं या भाजपा नगरसेवकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुनिष कुमार पोलिसावर चार ते पाचवेळा हात उचलत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

एका हॉटेलमध्ये ही मारहाण करण्यात आली असून मुनिष कुमार स्वत: या हॉटेलचा मालक असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित पोलीस अधिकारी आणि एक महिला या हॉटेलमध्ये आले होते. ही महिला वकील आहे. यावेळी दोघे दारु पिऊन वेटरशी हुज्जत घालत असल्याचं समजत आहे.

महिला ऑर्डर वेळेवर न आल्याने वेटरशी भांडत होती. याच कारणातून मुनिष कुमार यांचं भांडण झालं आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला. पोलिसांनी नगरसेवर मुनीष कुमारविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.