गुजरातमध्ये भाजपच्या एका नगरसेवकाला स्थानिक लोकांनी झाडाला बांधून मारहाण केली. ही घटना वडोदरा जिल्ह्यातील बोपड येथील नवी नगरी भागात घडली. नगरसेवक हसमुख पटेल हे या भागाचा दौरा करण्यासाठी आले होते. या वेळी संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांच्या रोषास त्यांना सामोरे जावे लागले. वडोदरा पालिकेने काही महिन्यांपूर्वी येथील झोपड्या हटवल्या होत्या. त्यावेळी पालिकेच्या या मोहिमेला काही नागरिकांनी विरोध केला होता. त्याच नागरिकांनी पटेल यांना मारहाण केली.

काही महिन्यांपूर्वी वडोदरा पालिकेने नवीनगरीतील १७५ झोपड्या आणि अनाधिकृत घरे हटवले होते. या मोहिमेनंतर या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या परिसरात घरांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, प्रशासनाने या भागात पाण्याची व गटारींची सोय केली नसल्याचा आरोप करत हे लोक पुन्हा नवी नगरी येथे राहण्यासाठी आले होते.

जेव्हा नगरसेवक पटेल हे या भागाचा दौरा करण्यासाठी आले तेव्हा स्थानिकांनी या बाबत त्यांच्याकडे तक्रार केली. पटेल यांनी अतिक्रमण विरोधी मोहिमेची आपल्याला माहिती नव्हती असे उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी त्यांना झाडाला बांधले आणि बेदम मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पटेल यांना रूग्णालयात दाखल केले.