देशातील एका महापालिकेत ‘वंदे मातरम’ गाण्यासाठी राष्ट्रगीत मध्येच थांबवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्या वेळी हा प्रकार घडला त्यानंतर संबंधीत पालिकेत मोठा गोंधळ माजला. मध्य प्रदेशातील इंदूर महापालिकेत बुधवारी हा प्रकार घडला. या महापालिकेत भाजपाची सत्ता आहे.

इंदूरच्या महापालिकेत बुधवारी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत सुरु असताना भाजपाच्या काही नगरसेवकांनी ते मध्येच थांबवले आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायला सुरुवात केली. या प्रकारामुळे पालिकेत चांगला गोंधळ माजला. या प्रकाराची व्हिडिओ क्लीपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये इंदूर महापालिकेच्या भाजपाच्या महापौर मालिनी गौड या देखील दिसत आहेत.

काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यापूर्वी ‘जन गण मन’ गायले जात होते. मात्र, काही सेकंदांतच भाजपाच्या नगरसेवकांनी ते अचानक मध्येच थांबवले आणि लगेचच ‘वंदे मातरम’ गायण्यास सुरुवात केली आणि ते शेवटपर्यंत गायले.

दरम्यान, राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी लावून धरल्याने पालिकेत एकच गोंधळ माजला. यावर प्रतिक्रिया देताना इंदूर पालिका आयुक्त अजयसिंह नरुका म्हणाले, नगरसेवकांनी जाणून बुजून हा प्रकार केला नसून चुकून घडला. त्यामुळे विनाकारण या प्रकाराला उचलून धरू नये.

अशा प्रकारे अचानक अर्ध्यावरच राष्ट्रगीत थांबवल्यास तो राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान ठरत असल्याने त्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे राष्ट्रीय प्रतिकांबाबतची नियमावली सांगते.