जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. नगरसेवक असणारे राकेश पंडिता त्राल परिसरातील आपल्या मित्राची घरी असताना दहशतवादी घरात घुसले आणि गोळीबार केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राकेश पंडिता यांचा जागीच मृत्यू झाला तर गोळीबारात आसिफा मुश्ताक नावाची एक महिला जखमी झाली आहे. महिलेवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पंडिता यांना सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा अधिकारी पुरवण्यात आले होते. तसंच त्यांना श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्राल येथे जाताना ते सुरक्षा सोबत घेऊन गेले नव्हते.

काश्मीर पोलिसांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी राकेश पंडिता सुरक्षेविानाच त्राल येथे गेल्याचं सांगितलं आहे. दरम्यान घटनेनंतर परिसर सील करण्यात आला असून शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाकडून निवेदन प्रसिद्ध करत शोक व्यक्त करण्यात आला आहे. “राकेश पंडिता यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं ऐकून दु:ख वाटलं. या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. संकटाच्या काळात आमच्या वेदना कुटुंबासोबत आहेत”.

माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून अशा हिंसाचारामुळे जम्मू काश्मीरला फक्त वेदना मिळत असल्याची खंत व्यक्त केली आहे.

राकेश पंडिता २०१८ मध्ये महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या मोठ्या पक्षांकडून यावेळी स्थानिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता.