पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाजपाच्या जिल्हा समितीचे सदस्य व माजी नगरसेवक मनिष शुक्ला यांची काही अज्ञातांनी टीटागढ येथे रविवारी सायंकाळी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेची दखल घेत बंगालचे राज्यपाल जयदीप धंकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व पोलीस महासंचालकांना समन्स पाठवलं आहे.

भाजपाच्या २४ उत्तर परगना जिल्हा समितीचे सदस्य असलेल्या मनिष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. टीटागढमध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मनिष शुक्ला हे पक्ष कार्यालयात जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. टीटागढ पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धंकर यांनी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलं.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असून, राज्यपालांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याचे गृह सचिव, अतिरिक्त गृहसचिव कृष्णा द्विवेदी व पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक विरेंद्र यांना आज उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपानं या घटनेवरून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसचा हा राजकीय दहशतवाद असल्याची टीका भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे. “भाजपाचे युवा नेते, वकील आणि माजी नगरसेवक मनिष शुक्ला यांची हत्या निंदनीय आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेखाली असलेल्या पश्चिम बंगालमधील रक्तरंजित राजकारणाचं हे उदाहरण आहे. या राज्य सरकारकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकते का? तृणमूलचा राजकीय दहशतवाद,” अशी टीका घोष यांनी केली आहे.