काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपानं काँग्रेसच्या वर्मावरच बोट ठेवलं आहे. काँग्रेस राहुल गांधी यांना किती वेळा लाँच करणार आहे. आता राहुल नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही, कारण इंधनच संपलं आहे. आता इस्त्रोनं जरी मदत केली, तरीही राहुल नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही,” असा टोला भाजपानं काँग्रेसला लगावला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे एकमेकांचे वाभाडे काढण्यात राजकीय आघाडी घेतल्याचं चित्र सध्या राजधानी दिल्ली अनुभवत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका हिंदी वृत्त वाहिनीनं चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात भाजपा आणि काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. यावेळी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून निशाणा साधला. पात्रा म्हणाले, “आज आत्मपरिक्षण करण्याची गरज काँग्रेसला आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभं राहता येत नाही आणि दररोज वर्तमानपत्र वाचलं तर राहुल गांधी यांना रिलाँच करणार, असं वृत्त वाचायला मिळतं. काँग्रेस किती वेळा हे सॅटेलाईट लाँच करणार आहे. किती वेळा लाँच करणार आहे. मी लोकांना सांगतो की, हे राहुल गांधी नावाचं सॅटेलाईट लाँच होऊच शकत नाही, कारण इंधनच संपलं आहे. आता इस्त्रो जरी आली आणि त्यांनी मदत केली तरीही राहुल सॅटेलाईट लाँच होणार नाही,” असं सांगत पात्रा यांनी काँग्रेसच्या जिव्हारी घाव केला.

भाजपाच्या टीकेचं कारण?

काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याआधीपासूनच भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरूवात झाली. सोनिया गांधी यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल गांधी यांची निवड करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुका लढवल्या. काही राज्यातील निवडणुका वगळल्या, तर काँग्रेसला समाधानकारक यश मिळवता आलं नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी पुन्हा अपयश आलं आणि राहुल गांधीचं नेतृत्व अपयशी ठरत असल्याची चर्चाही त्यानंतर सुरू झाली. त्यात राहुल गांधी यांनी तडकाफडकी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे.