हिंमत असल्यास उत्तर प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी, असे आव्हान भाजपने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांना दिले आहे. आझम खान यांनी काही दिवसांपूर्वी रा. स्व. संघाविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते.
आझम खान यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, उत्तर प्रदेशात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असल्यास त्यांनी उत्तर प्रदेशात रा. स्व. संघावर बंदी घालावी, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वायपेयी यांनी दिले आहे.
आझम खान केंद्र सरकारकडे याचना का करीत आहे, राज्यात त्यांचा पक्ष सत्तेवर आहे त्यामुळे त्यांनी आदेशावर स्वाक्षरी करावी, असे वायपेयी म्हणाले. रा. स्व. संघाबद्दल खान यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठविले होते त्यावर वायपेयी यांनी वरील आव्हान दिले आहे.
देशातील सर्व नागरिक हिंदू आहेत, हा रा. स्व. संघाचा मतप्रवाह घटनेच्या मूलभूत तत्त्वाविरोधात आहे, त्यामुळे याची गंभीर दखल घ्यावी, असे आझम खान यांनी राजनाथ सिंह यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.
देशातील सर्व नागरिक हिंदू आहेत या विधानामुळे मुस्लीम जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, कोणत्याही क्षणी आपल्या अधिकारांवर गदा येईल, असे मुस्लीम जनतेला वाटत आहे, असेही खान यांनी पत्रात म्हटले आहे.