मध्य प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्यापूर्वी आवाजी मतदानाने नव्हे तर मतविभागणीद्वारे बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या वतीने शनिवारी राज्यपाल लालजी टंडन यांना सादर करण्यात आले. बहुमत चाचणी रविवारी घ्यावी, असे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे यांच्या अनेक समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने मुख्यमंत्री कमल नाथ यांचे सरकार अडचणीत आले आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी वार्ताहरांना सांगितले की, आम्ही राज्यपालांना निवेदन दिले आहे, काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले आहेत आणि त्या आमदारांनी व्हिडीओद्वारे राजीनामे दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कमल नाथ सरकार आता अल्पमतात गेले असल्याने त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे चौहान म्हणाले.

या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे अभिभाषण, अर्थसंकल्पीय अधिवेशन निर्थक आहे अधिवेशनापूर्वी सभागृहामध्ये राज्यपालांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकाच्या देखरेखीखाली बहुमत चाचणी झाली पाहिजे आणि त्याचे  चित्रीकरणही झाले पाहिजे, असे चौहान म्हणाले. बहुमत चाचणी बटण दाबून घेण्यात यावी, आवाजी मतदानाने घेऊ नये, अशी मागणीही भाजपने केली आहे.