संसदेत मांडल्या जाणाऱ्या स्वतंत्र तेलंगणच्या विधेयकात वेगळ्या विदर्भाच्या दुरुस्तीचा अंतर्भाव  करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना मंगळवारी केली. स्वतंत्र विदर्भाविषयी प्रतिबद्ध असलेला भाजप सक्रिय भूमिका बजावेल, अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिली.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खासदार हंसराज अहीर, अनिल धोत्रे, अजय संचेती, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, रणजित पाटील, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, नागपूरचे महापौर अनिल सोले आदी नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे आणि रवीशंकर प्रसाद यांच्याशी स्वतंत्र विदर्भाविषयी या शिष्टमंडळाने चर्चा केली. तेलंगणचे विधेयक संसदेत मांडल्यावर भाजपने त्यात विदर्भ राज्याचा अंतर्भाव करण्याची दुरुस्ती सुचवावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तेलंगणसोबत विदर्भाची निर्मिती व्हावी, अशी फाझल अली आयोगाने शिफारस केली होती. शिवाय, भुवनेश्वर येथे १९९२ साली झालेल्या अधिवेशनात भाजपने स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव पारित केला होता, याकडे त्यांनी भाजपश्रेष्ठींचे लक्ष वेधले.
विदर्भाच्या मागणीसाठी होणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला भाजपची नैतिक तसेच रस्त्यावर उतरून समर्थन देण्याची तयारी आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही निसंदिग्ध शब्दात समर्थन करावे. तेलंगणच्या विधेयकात विदर्भाच्या मागणीचा समावेश केल्यास  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ठोस भूमिका घ्यावीच लागेल, असे पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले.