पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान हिंसाचाराचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथे केंद्रीय दलांचा पुरेसा बंदोबस्त ठेवावा आणि दोन्ही राज्यांमध्ये निरीक्षक तैनात करावे, अशी मागणी भाजपने सोमवारी निवडणूक आयोगाकडे केली.
पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये मुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पडाव्या यासाठी पावले उचलावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे एका निवेदवाद्वारे केली.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने, केरळच्या मतदारयादीत मोठय़ा प्रमाणावर गोंधळ असल्याचा आरोप केला. केरळची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार तीन कोटी ३४ लाख सहा हजार ६१ इतकी आहे, मात्र मतदार यादीत दोन कोटी ५६ लाख २७ हजार ६२० मतदार दाखविण्यात आले आहेत. जनगणनेत १८ वर्षांखालील नागरिकांचाही समावेश असल्याने ही आकडेवारी अशक्य आहे, असे नक्वी यांनी म्हटले आहे.