गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज (गुरूवार) सांगता होणार आहे. तत्पूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. यूपीएच्या काळात ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्याविरोधात आमच्या सरकारने सक्त कारवाई केली. पण भाजप सरकारने आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाऱ्यांवर अशी कारवाई केली नाही. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात मोदी कठोर पाऊले उचलताना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

राजकोट येथे पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप व पंतप्रधान मोदींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. नोटाबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे करत ते म्हणाले, सरकारने जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केली. त्यामुळे नोटाबंदीनंतर लोकांना रोजगार गमवावा लागला. त्याचबरोबर सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. देशाची राष्ट्रीय सुरक्षा या सरकारच्या असुरक्षित विदेश नीतींमुळे ढेपाळली आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे देशाच्या हिताचे नसल्याचे ते म्हणाले.

मी पंतप्रधान असताना मोदी माझ्याबरोबर नर्मदा नदीबाबत चर्चा केल्याचे सांगतात. पण मोदींबरोबर या मुद्यावरून चर्चा झाल्याचे मला आठवत नाही. ते जेव्हा-जेव्हा मला भेटू इच्छित तेव्हा मी त्यांची भेट घेत असत. पंतप्रधान या नात्याने सर्व मुख्यमंत्र्यांना भेटणे ही माझी जबाबदारी होती, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.

जीएसटीपूर्वी व्यापाऱ्यांबरोबर चर्चाच करण्यात आली नाही. मोदींनी व्यापाऱ्यांना आणि गुजरातींना धोका दिला आहे. नोटाबंदीचा निर्णय हा देशासमोरील संकटं वाढवणारा निर्णय असल्याचे सांगत त्यांनी यामुळे भ्रष्टाचारावर निर्बंध लागला नसल्याचे म्हटले. या निर्णयामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. देशातील रोजगार निर्मिती मंदावली आहे. यामुळे गरिबांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी त्यांनी यूपीए सरकारच्या काळात देशाचा विकास दर वेगाने वाढत होता. मोदी सरकारला तो वेग प्राप्त करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.